आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Mahrashtra Gram Panchayat Election 2022 Udpate | Shindesena Heavy In Aurangabad District, Shirsat's Charisma In Vadgaon Kolhati; Winning 11 Out Of 16 Seats

90% जागा जिंकल्या:औरंगाबाद जिल्ह्यात शिंदेसेना भारी, शिरसाटांचा वडगाव कोल्हाटीत करिष्मा; 16 पैकी 11 जागांवर विजय

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सत्तांतरात औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक आमदार बंडखोर झाले. त्यामुळे या बंडखोरांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेनेने त्यांच्याविरोधात पूर्ण शक्ती पणाला लावली होती. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. जिल्ह्यातील १६ पैकी ११ ग्रा.पं.वर शिंदे गटाने वर्चस्व प्रस्थापित केले. हिंदुत्व, आम्ही शिवसैनिकच आणि विकास निधीचा वादा हा फॉर्म्युला आमदार संजय शिरसाट, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार यांना फायद्याचा ठरल्याचे दिसते. ३७ हजारांपेक्षा अधिक मतदार असलेली बहुचर्चित वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायत शिरसाट यांनी एकहाती करिष्मा दाखवत जिंकली. शिंदे गटाचे नवे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासह नव्या फळीचीही यात महत्त्वाची भूमिका होती. मात्र, यंदा भाजप, उद्धव गटाचाही चंचुप्रवेश झाला आहे.

वडगाव कोल्हाटी-बजाजनगरात २०१७ मध्ये शिवसेनेचे १७ पैकी १६ जण निवडून आले होते. उद्धव गटाचा विरोध पत्करून एकट्याच्या बळावर यश संपादन करणे तसे कठीण होते. पण शिरसाट यांनी ते साध्य केले. उद्धव गटाला मतदान केले तर ते काँग्रेस-राष्ट्रवादीला म्हणजे हिंदुत्वाच्या विरोधातच असेल. आम्ही शिवसेना सोडलेलीच नाही. आम्ही शिवसैनिकच आहोत. आणि राज्यात शिंदेसेना सत्तेत असल्याने आम्हाला मतदान केले तरच विकासकामांसाठी निधी मिळेल, या मुद्द्यांवर त्यांनी आक्रमक प्रचार केला. त्यामुळे शिंदेसेना शिरसाट गटाचे ११, भाजपचे २, शिवसेनेचे ४ जण निवडून आले. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

उद्धव गटाचे तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड म्हणाले की, शिरसाटांनी ‘बाळासाहेब ठाकरे’ यांच्याऐवजी स्वत:च्या नावाचे पॅनल करण्याची हिंमत दाखवायला हवी होती. चार जागा मिळाल्याने आम्हीच बाजीगर ठरलो आहोत. तर भाजपच्या जागा एकवरून दोन झाल्याचा आनंद असल्याचे माजी महापौर भगवान घडमोडे म्हणाले. भविष्यात आम्हाला पक्षवाढीची पूर्ण संधी आहे. त्या दिशेने आमची वाटचाल सुरू झाल्याचा दावा त्यांनी केला.

वडगाव-बजाजनगरचे विजयी उमेदवार असे
वॉर्ड १ : सुनील काळे, सुनीता राजेश साळे, छाया सोमीनाथ प्रधान (शिंदेसेना). वॉर्ड २ : माधुरी राजन सोमासे, विष्णू उगले (शिंदेसेना).
वॉर्ड ३ : सागर शिंदे (शिवसेना),
माया सतीश पाटील (भाजप), राणी राम पाटोळे (शिंदेसेना). वॉर्ड ४ : संभाजी चौधरी (भाजप), पूनम भोसले, सुरेखा लगड (शिंदेसेना). वॉर्ड ५: मंदा कैलास भोकरे, कमल कल्याणराव गरड,
विजय सरकटे (उद्धवसेना).
वॉर्ड ६ : श्रीकांत साळे, उषा हांडे, रामदास गवळी (शिंदेसेना).

हॅट्रीक केलेले भोळे नवख्याकडून पराभूत
यापूर्वी तीनदा निवडून आलेले शिरसाट गटाचे श्रीकृष्ण भोळे यांचा पराभव नवख्या विजय सरकटे यांनी केला. २०१७ मध्ये विजयी झालेले भाजपचे अमित चोरडिया यांना नवख्या विष्णू उगलेंनी पराभूत केले. वाॅर्ड तीनमध्ये शिरसाट कुटुंबीयांसह तीन दिवस तळ ठोकून होते. तेथे त्यांचा एकच सदस्य विजयी झाला. ग्रामपंचायत जिंकली आता लक्ष पंचायत समिती, जिल्हा परिषद आहे. त्यासाठी पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून भाजपसोबत लढण्याची तयारी आहे, असे आमदार संजय शिरसाट म्हणाले.

आघाडीला तिथे आणि इथेही नाकारले
राज्यात महाविकास आघाडी करून लढणाऱ्या सरकारला तिथे नाकारले आणि सत्तांतर झाले. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीला सोबत घेऊन लढणाऱ्या उद्धव गटाला जनतेने इथेही नाकारले.
-राजेंद्र जंजाळ, जिल्हाप्रमुख, शिंदे गट

बातम्या आणखी आहेत...