आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतळा अनावरणाचा सस्पेन्स कायम:सरकारी ‘मुहूर्ता’वरच शिवसेनेच्या शिवजयंती साेहळ्याचे नियोजन

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारीख व तिथीनुसार अशी वेगवेगळ्या दिवशी साजरी न करता एकाच दिवशी साजरी करावी, अशी जनभावना आहे. सरकारने त्याचा आदर करून एकाच दिवशी हा उत्सव साजरा करण्याचे निश्चित करावे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट यांनी साेमवारी केली. तसेच यंदा तारखेनुसार पक्ष साेहळा साजरा करत असल्याचे सांगत १९ फेब्रुवारी राेजी माेठ्या उत्साहात साेहळा साजरा करणार असल्याचेही सांगितले.

शिवसेनेतर्फे उत्सव समिती गठित करण्यात आली असून अध्यक्षपदी नितीन घोगरे तर कार्याध्यक्षपदी ऋषिकेश जैस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली. या समितीने १५ ते १९ फेब्रुवारीदरम्यान शिवमशाली यात्रा, वक्तृत्व स्पर्धा, व्याख्यान, महाअभिषेक व छत्रपती शिवरायांची आरती आदी कार्यक्रमांचे आयाेजन केले आहे. तीन दिवसांत तब्बल ३६ शिवमशाली असलेली यात्रा एका रथावरून क्रांती चौकात पोहोचणार आहे. या यात्रेचे नेतृत्व शिवसेनेचे सर्व उपशहरप्रमुख करतील. महिला आघाडीसह शिवसेनेच्या विविध आघाड्यांकडून स्वतंत्रपणे ही शिवमशाल यात्रा काढली जाणार आहे. दररोज सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजता नावाजलेले वाद्यवृंद मानवंदना देणार आहेत. तसेच रोज सायंकाळी चार वाजता महाअभिषेक आणि छत्रपती शिवरायांच्या आरतीचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजन केले आहे. हे सर्व कार्यक्रम क्रांती चौकात हाेतील.

१५ फेब्रुवारी राेजी सायंकाळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिवचरित्रावर आधारित वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. १६ फेब्रुवारीला सायंकाळी युवा शाहीर गणेश गलांडे हे शाहिरी सादर करतील. १७ फेब्रुवारीला शिवचरित्राचे अभ्यासक प्रदीप सोळुंके यांचे व्याख्यान होईल. १८ फेब्रुवारीला सकाळी मानवंदना व रात्री ९ ते बारा वाजेपर्यंत सुमारे १२०० युवक-युवतींचे ढोलपथक सादरीकरण करणार आहे. तसेच रोजच्या कार्यक्रमाचा समारोप देवींच्या आरतीने होऊन फटाक्यांची आतषबाजी केली जाणार आहे.

पुतळा अनावरणाचा सस्पेन्स कायम
क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चाैथऱ्यावर ठेवून २२ दिवस उलटले तरी अद्याप महापालिका प्रशासन अनावरणाची तारीख जाहीर करण्यास तयार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवजयंतीला (१९ फेब्रुवारी) हा साेहळा हाेईल. मात्र हे गुपित अजून का उलगडले जात नाही, हा प्रश्नच आहे. याबाबत शिवसेना आमदार दानवे यांना विचारले असता ‘शिवजयंतीपूर्वी अनावरण हाेईल’ एवढेच माेघम उत्तर त्यांनी दिले. विशेष म्हणजे १५ ते १९ फेब्रुवारीदरम्यान क्रांती चाैकात शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रम सादर केले जातील तेव्हाही महाराजांचा पुतळा मात्र झाकलेलाच असेल.

झाकलेल्या पुतळ्यासमाेर पाच दिवस विविध कार्यक्रम
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर क्रांती चाैकात १३ ते १९ फेब्रुवारीदरम्यान श्री छत्रपती शिवचरित्र पारायण सप्ताहाचे आयाेजन करण्यात आले आहे. त्यात पारायण समितीचे अध्यक्ष चंद्रकांत भराट यांच्यासह सर्वधर्मीय लाेक सहभागी हाेत आहेत. महिला, विद्यार्थी, विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग साेमवारी दिसून आला.

बातम्या आणखी आहेत...