आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा19 फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी होणार आहे. आग्रा येथील ऐतिहासीक किल्ल्यामध्ये शिवजयंतीच्या भव्य कार्यक्रमाचे नियोजन अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान व आर. आर. पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी केले होते. त्यासाठी त्यांनी पुरातत्व विभागाकडे रितसर परवानगी मागितली होती. मात्र कोणतेही कारण न देता परवानगी नाकारण्यात आली आहे. त्याविरोधात अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे 11 नोव्हेंबर 2022 पासून या परवानगीसाठी प्रयत्न केले जात होते. वेळोवेळी पाठपुरावा करुनही शिवजयंती साजरी करण्यास परवानगी नाकरण्यात आली आहे. विशेष म्हणज्ये याच आग्र्याच्या किल्ल्यामध्ये यापूर्वी आगाखान पुरस्कार कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली होती. एवढेच नाही तर अदनान सामीच्या कॉन्सर्टलाही परवानगी देण्यात आली होती.
परवानगी का नाकारली?
ज्यांचा ऐतिहासीक संबध त्या किल्ल्याशी नाही अशांना परवानगी दिली जाते. मग त्या किल्ल्याशी ऐतिहासीक संबध असलेल्या शिवाजी महाराजांच्या जयंतीलाच परवानगी का नाकारली असा संतप्त सवाल अजिंक्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी केला आहे.
नियमावली नाही
शिवजयंतीला परवानगी नाकारताना पुरातत्व विभागाने कोणतेही कारण दिलेले नाही. मुळात किल्ल्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी देण्याबाबत कुठलीही नियमावली नाही. त्यामुळेच पुरातत्व विभाग पक्षपातीपणा आणि मनमानीपणा करत असल्याचा आरोप विनोद पाटील यांनी केला आहे.
आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करायला परवानगी द्यावी, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय सांस्कृतीक मंत्री जी. किशन रेड्डी यांना शिफारस पत्रही दिले होते. एवढेच नाही तर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय पुरातत्व खात्याच्या मंत्र्यांची तीनवेळा भेटही घेतली. तरीही परवानगी नाकारली.
ऐतिहासिक महत्त्व
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नाही तर देशाचे आदर्श आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांची आग्रा भेट हा शिवचरीत्रातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. तह करण्याचा निमित्ताने औरंगजेबाने विश्वासाने शिवाजी महाराजांना आग्र्यात बोलावून घेतले होते. तिथे मात्र महाराजांचा अपमान करुन त्यांना कपटाने कैद केले होते. बुद्धीचातुर्याची चुणूक दाखवत महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन तिथून निसटले होते. या घटनेमुळे आग्रा या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व आहे.
शिवप्रेमींमध्ये संताप
आग्रा किल्ला याठिकाणी काही थिल्लर कार्यक्रमांना परवानगी दिली जाते आणि देशाचे भूषण असलेल्या शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमाला परवानगी दिली जात नाही. यावरुन देशभर शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
परवानगी मिळेल असा विश्वास
न्यायदेवतेवर आपला संपूर्ण विश्वास आहे. न्यायालयाकडून आपल्याला न्याय मिळेल आणि आग्र्याच्या किल्ल्यामध्ये शिवजयंतीचा भव्य सोहळा साजरा करण्याची परवानगी मिळेल असा विश्वासही विनोद पाटील यांनी व्यक्त केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.