आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसैनिकांची निदर्शने:बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक ; क्रांती चौकात जोरदार घोषणाबाजी

औरंगाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंडखोर शिवसेना आमदारांविरुद्ध बुधवारी झालेल्या आंदोलनात शिवसेनेतील दुफळी चव्हाट्यावर आली. नेहमी अशा आंदोलनात अग्रेसर असणारे अनेक शिवसैनिक, पदाधिकारी गैरहजर होते. माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी तर ‘जिल्ह्याची घडी बिघडवणारेच निदर्शने करत आहेत. हे अजबच आहे,’ अशी टीका केल्याने शिवसेनेतील दुफळी चव्हाट्यावर आली. काही जणांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यावर नाराजी व्यक्त केली.

औरंगाबाद शहर शिवसेनेत माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, अंबादास दानवे आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी असे पाच गट आहेत. त्यातील जैस्वाल, शिरसाट बंडात सहभागी असल्याने क्रांती चौकात बुधवारी झालेल्या आंदोलनात नेमके काय होते याविषयी औत्सुक्य होते. दानवे यांच्यासह माजी महापौर नंदकुमार घोडेले, राजू वैद्य, त्र्यंबक तुपे, बाळासाहेब थोरात, सचिन खैरे, प्रतिभा जगताप, हनुमान शिंदे यांनी या निदर्शनाचे नेतृत्व केले.

खूप निधी मिळाला म्हणून ते काही लोकांच्या पाठीमागे गेले. मात्र ते शिवसेनेत होते म्हणून हे सगळे होऊ शकले. ते आता पडद्यात आहे. मात्र वेळ आली तर हा पडदा टराटरा फाडला जाईल. हा काळ संघर्षाचा आहे आणि तो संघर्ष करण्यासाठी आम्ही तयार आहोत. काहीही झाले तरी आम्ही पक्षासोबत आहोत, असे दानवे म्हणाले. तेव्हा औरंगाबाद पूर्व महिला आघाडी अध्यक्ष मीरा देशपांडे, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप आदींना रडू आवरले नाही.

शिंदेंचा काॅल, दानवेंचा इन्कार : दरम्यान, या बुधवारच्या आंदोलनानंतर अंबादास दानवे यांना एकनाथ शिंदे यांचा ‘अशा प्रकारची आंदोलने करू नये’ असे सांगणारा काॅल आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. याबाबत दानवेंशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, असा काही काॅल आला नव्हता.

आदेश आला की रस्त्यावर उतरू : राजेंद्र जंजाळ आंदोलनाकडे पाठ वळवणारे माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ म्हणाले की, ज्यांच्यावर जिल्ह्याची घडी बसवण्याचे काम होते त्यांनीच ती विस्कटवली आणि आता तेच आंदोलन करीत आहेत. अशा निदर्शनास जाऊन काय उपयोग? अशी अनेकांची भावना आहे. आम्ही शिवसैनिक आहोत. आदेश आला की रस्त्यावर उतरू. असेही ते म्हणाले. शहरप्रमुख विजय वाघचौरे यांनी वैद्यकीय अडचणीमुळे गेलो नाही, असे सांगितले. जिल्हा उपप्रमुख राजेंद्र राठोड म्हणाले की, मी परदेशात जाण्यासाठी कालच शहराबाहेर पडलो.

पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष, एकाच चेहऱ्यामुळे ही अवस्था एकनाथ शिंदेंसोबत सर्वाधिक ५ जण औरंगाबादचे आहेत. त्यात दोन मंत्री आहेत. ही सगळी अवस्था पालकमंत्री सुभाष देसाईंच्या दुर्लक्षामुळे झाली. दोन वर्षांत त्यांनी जिल्ह्यातील आमदारांना कधीच विश्वासात घेतले नाही. पक्षकार्य आणि शासकीय कार्यक्रमातून कायम दूर केले. शिवसैनिकांना कधी जवळ केले नाही. केवळ एकाच विधान परिषदेच्या आमदारांना जवळ करून कारभार चालवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक ठिकाणी एकच चेहरा समोर येत होता, अशी तक्रार अनेक शिवसैनिकांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर केली.

भाजप आमदारांना एकत्र जमण्याच्या सूचना नाहीत, मात्र वेळेत मुंबईत पोहोचण्याची तयारी ठेवण्याचे आदेश

भाजपच्या आमदारांना मुंबईत बोलावले, अशा बातम्या सुरू होत्या. या संदर्भात दिव्य मराठीने अधिक माहिती घेतली. तेव्हा असे समोर आले की, आमदारांनी आपापल्या मतदारसंघात थांबावे, असे निर्देश दिले आहेत. बहुमत सिद्ध करण्याची वेळ आल्यास वेळेत मुंबईला पोहोचता यावे, अशी तयारी ठेवण्याची सूचना पक्षश्रेष्ठींनी केली आहे. पूर्वचे आमदार अतुल सावे बुधवारी शहरात विविध कार्यक्रमांना हजेरी लावत होते. ते म्हणाले की, फक्त राज्याबाहेर जाऊ नये, एवढीच सूचना आहे. गंगापूरचे आमदार प्रशांत बंब म्हणाले की, मी योगायोगाने मुंबईत आहे. फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार आल्यास आनंद होईल. मला मंत्रिपद नको. मतदारसंघातील थांबलेला विकास पुन्हा सुरू होणे गरजेचे आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांनीही पक्षाकडून मुंबईत पोहोचण्याची सूचना नाही. त्यामुळे मतदारसंघातील गणोरी गावात असल्याचे सांगितले.

इम्तियाज यांनी केले कौतुक मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी तोंडभरून कौतुक केले आहे. ट्विटवर त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांविषयीचा आदर माझ्या मनात अनेक पटींनी वाढला. तुमच्या नम्रतेने सर्व विरोधकांना जोरदार चपराक मिळाली आहे.

बातम्या आणखी आहेत...