आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवार्ता:शिवसैनिकांच्या कारने दांपत्याला उडवले; चारवर्षीय चिमुकली ठार

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा संपवून निघालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भरधाव कारने एका दांपत्याला धडक दिली. यात दुचाकीचा तोल जाऊन त्यांची चार वर्षांची चिमुकली लांब फेकली गेली. कार इतकी सुसाट होती की चिमुकलीला चिरडून ती निघून गेली. गंभीर जखमी झालेल्या श्रावणी सतीश राऊत (एन-६) हिला रात्री उशिरा डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सभेसाठी मराठवाड्यातून गाड्या भरून कार्यकर्ते आले होते. अनेक पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघातून वाहनातून नागरिक आणले होते. रात्री ९.३० वाजता सभा संपल्यानंतर सर्व वाहने आपापल्या गावाकडे निघाली. एक कार क्रांती चौकाकडून विमानतळाच्या दिशेने जात होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार कार भरधाव होती. एपीआय कॉर्नर येथे श्रावणी आई-वडिलांसोबत मोपेड दुचाकीवरून जात होती. अचानक कारने त्यांच्या दुचाकीला उडवले. यात श्रावणी लांब फेकली गेली. रस्त्यावर कोसळल्यानंतर कारचे चाक तिच्या अंगावरून गेले. स्थानिकांनी धाव घेत तिला सेव्हन हिल्स येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. कारमध्ये गळ्यात भगवे मफलर घातलेले तरुण होते. कारचालकाला लोकांनी पकडले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिडकोचे डी.ओ. जाधव, अंमलदार हरसिंग बोहरा, बीट मार्शल घटनास्थळी पोहोचले. चिमुकलीला उडवणाऱ्या चालकाला स्थानिकांनी मारहाण सुरू केली. पोलिसांनी त्याची सुटका करत तिघांना ठाण्यात नेले. वाहनातील इतर तरुणांनी पोबारा केला. हे सर्वजण उस्मानाबादचे पदाधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...