आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नाराजी अनलॉक:आघाडी सरकारमधील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रंगला कलगी तुरा, भाजपचे खतपाणी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आघाडीतील नाराजीनाट्य - तिन्ही पक्षांचे टि्वट, भाष्याद्वारे एकमेकांवर शरसंधान

महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरबुरी नसल्याचा दावा तिन्ही पक्षांचे नेते करत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांतील नाराजीनाट्य वारंवार समोर येत आहे. शुक्रवारीच सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण नाराज असून त्यांनी ही नाराजी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्याचे सूत्र सांगत आहेत. मागील दोन महिन्यांत अनेकदा हे नाराजीनाट्य घडले. त्या त्या वेळी भाजपने विरोधी पक्षाची भूमिका वठवत वारंवार या कुरबुरींवर चिथावणीखोर भाष्य करत हा कलगीतुरा रंगवत ठेवला आहे.

जुलै २०२० : आघाडीतील नाराजीनाट्य - तिन्ही पक्षांचे टि्वट, भाष्याद्वारे एकमेकांवर शरसंधान
काँग्रेसची नाराजी

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी अशोक चव्हाण यांना न विचारता मंजुरीसाठी मांडल्याने अशोक चव्हाण नाराज असल्याचे सूत्र सांगताहेत. तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे सत्तेत समान वाटा मिळावा, कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर काँग्रेसलाही विचारात घ्यावे, अशी अपेक्षा काँग्रेसचे नेते आणि आघाडी सरकारमधील मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून व्यक्त केली होती. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नितीन राऊत यांच्यानंतर विजय वडेट्टीवारांनीही आपली नाराजी व्यक्त केली होती.

३ ते ७ जुलै : पारनेर नगरसेवक प्रकरण
- शिवसेनेला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नगरमधील पारनेर नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांचा बारामतीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश.
- राष्ट्रवादीच्या रणनीतीचा वचपा काढत कल्याणमध्ये शिवसेनेची नवी राजकीय खेळी, कल्याण पंचायत समितीमध्ये थेट भाजपशी हातमिळवणी.
- महाविकास आघाडीतील पक्षांमध्येच झालेले पक्षांतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी. आमचे नगरसेवक परत पाठवा, असा अजित पवार यांना निरोप.
- पाचही नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर. हातावर शिवबंधन बांधून सेनेत घरवापसी, तर राष्ट्रवादीला अलविदा.

महाजॉब्स पोर्टल
महाजॉब्सच्या जाहिरातीत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याने, त्यावर युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे, खासदार राजीव सातव, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याने, तांबे यांनी टि्वट करत प्रश्न विचारला होता की “महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की शिवसेना-राष्ट्रवादीची?

अजोय मेहता नियुक्ती प्रकरण
महाविकास आघाडीतील वादानंतर मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढ मिळाली नाही. मेहता यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सल्लागारपदी नियुक्ती झाली. त्यावरून महाविकास आघाडीत कुरबुर झाली. मेहता यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध होता. बाळासाहेब थोरात यांनी तर अधिकारी सर्वस्वी नाहीत, तर मुख्यमंत्री आहेत असे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेताना दोन्ही काँग्रेसला विचारात घ्यावे, असे काँग्रेसने म्हटले होते.

मुंबई पोलिस अधिकारी बदल्या
मुंबई पोलिस दलातील १२ उपायुक्तांची दोन जुलैला बदली करण्यात आली होती. त्यानंतर शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. या बदल्यांना मुख्यमंत्री आणि गृह मंत्रालय कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आल्याचे टि्वट गृहमंत्री देशमुख यांनी केले होते.

विरोधी पक्ष भाजपची सतत चिथावणी
महाजॉब्स पोर्टल प्रकरणी आघाडीतील कुरबुर टि्वटरद्वारे चव्हाट्यावर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी, “ज्यांचे फोटो छापायचे आहेत, ज्यांचे चेहरे दाखवायचे आहेत, त्यांचे दाखवा, आपापसात मारामाऱ्या करा, फक्त लोकांना फायदा झाला पाहिजे याकडे लक्ष द्या,” अशा शब्दांत टीका केली होती.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना वारंवार मातोश्रीवर जावे लागत असल्यावरून चंद्रकांत पाटील यांनी या वयात पवार यांना वारंवार मातोश्रीवर जावे लागत आहे, याचे दु:ख वाटते असे भाष्य केले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही टि्वट करत टोलेबाजी केली होती.

पोलिस दलातील बदल्यांच्या निमित्ताने तयार झालेल्या स्थितीवरून महाविकास आघाडी सरकारवर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली होती. आघाडी सरकारमध्ये कुरघोडीचा प्रयत्न सुरू असून त्यातूनच या बदल्यांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलीच गेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या बदल्या थांबवल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले होते.