आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज ठाकरे यांचे नव्हे, तर शिवसेनेचे हिंदुत्व खरे आहे, असे सांगण्यासाठी ८ जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होत आहे. मात्र, त्यात पाणीटंचाईचाच मुद्दा लोकांसाठी महत्त्वाचा असेल. त्यावरून भाजपचे काही कार्यकर्ते, पदाधिकारी घोषणाबाजी करू शकतात, अशी भीती व्यक्त झाली. त्यामुळे पोलिसांनी ११ जणांना नोटिसा दिल्या. ४ एप्रिल रोजी मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या बंगल्याबाहेर सरकारविरोधी घोषणाबाजी केल्याबद्दल १ जूनला काढलेली नोटीस ७ जून रोजी बजावण्यात आली. तुम्ही ‘आडदांड’ असून शासनाविरुद्ध घोषणाबाजी करण्याच्या स्वभावाचे दिसून येता. म्हणून वर्षभर सार्वजनिक ठिकाणी शांतता राखण्याची हमी द्या, असे त्यात म्हटले आहे. मंगळवारी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. पण त्याचा भाजपला राजकीय फायदा होऊ शकतो, असे लक्षात आल्यावर “नंतर या’ असे सांगण्यात आले.
विशेष कार्यकारी दंडाधिकारी अशोक थोरात यांनी बजावलेल्या नोटिसीत म्हटले आहे की, तुम्ही आडदांड व कोणतीही परवानगी नसताना अडथळा निर्माण करून शासनाविरुद्ध घोषणाबाजी करण्याचे स्वभावाचे दिसून येत असून आगामी काळात तुमचेकडून सदर कारणावरून वाद होऊन त्यातून एखादा शरीराविरुद्धचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडून सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता वाटते. यावरून तुम्ही वरीलप्रमाणे कृत्य केल्याबाबत आमची खात्री झाली आहे. तुमचेकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडून त्यातून तुम्ही राहत असलेल्या भागामध्ये सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग होईल असे आमचे मत झालेले आहे. त्यामुळे तुम्हांस हमीदाराशिवाय मोकळे सोडणे उचित वाटत नाही. तरी तुम्ही तुमची सार्वजनिक शांतता भंग करणार नाही. यासाठी तुमचेकडून १०,००० रुपये इतक्या रकमेचा वैयक्तिक व तुमचेवर नियंत्रण ठेवणाऱ्या सदर भागातील प्रतिष्ठित नागरिक असे हमीदाराचे हमीसह एक वर्ष मुदतीचे शांतता राखणेकामी बंधपत्र का घेण्यात येऊ नये? याची कारणे दाखविण्यासाठी सदरची नोटीस देण्यात येत आहे.
लोकभावनेचे पडसाद उमटणार नाहीत, याची काळजी घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न : केणेकर भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर म्हणाले की, औरंगाबाद शहराच्या १३ प्रश्नांसंबंधी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा आमचा प्रयत्न होता. त्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांना विनंती केली. पण ती मिळाली नाही. उलट माझ्यासह आमदार अतुल सावे, माजी नगरसेवक शिवाजी दांडगे, प्रमोद राठोड, भाजयुमोचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक राजगौरव वानखेडे, नितीन चित्ते, गणेश नावंदर, नितीन खरात, बालाजी मुंडे, मनीषा मुंडे, माधुरी अदवंत, भाजप महिला आघाडी शहराध्यक्ष अमृता पालोदकर, गीता कापुरे, रेखा जैस्वाल आदींना नोटीस बजावली. लोकभावनेचे पडसाद उमटू नयेत याची काळजी पोलिस घेत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशी लाचारांची असूच शकत नाही. दरम्यान, एका पितळी हंड्याला निवेदन लावून ते वृद्ध महिलेच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना देण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.