आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर:‘भाजप कार्यक्रमाला हजेरी का लावली?’ म्हणत आमदारांची भावजयीला मारहाण, शिवसेना आमदार रमेश बोरनारेंसह 10 जणांविरुद्ध गुन्हा

वैजापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याचा राग मनात धरून मारहाण केल्याच्या आराेपावरून वैजापूरचे शिवसेनेचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्यासह दहा जणांविरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आमदार रमेश बोरनारे यांच्या चुलत भावजयीनेच स्थानिक पाेलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

वैजापूर तालुक्यातील सटाणा येथे शेती व्यवसाय करणाऱ्या ४१ वर्षीय भावजयीने तक्रारीत म्हटले आहे की, त्या व त्यांचे पती हे शुक्रवारी दुपारी वैजापुरात राहणाऱ्या पुतणीच्या सासऱ्यांच्या वर्षश्राद्धासाठी आले हाेते. तेथेच आमदार रमेश बाेरनारे, संजय नानासाहेब बाेरनारे, दीपक बाबासाहेब बाेरनारे, अजिंक्य संपत बाेरनारे, रंजित मधुकर चव्हाण, संपत नानासाहेब बाेरनारे, अबाेली संजय बाेरनारे, वर्षा संजय बाेरनारे, संगीता रमेश बाेरनारे व दिनेश शाहू बाेरनारे हेही आलेले हाेते. उपराेक्त मंडळींनी फिर्यादी भावजयी व त्यांचे पती यांना खासगीत बाेलण्याचे निमित्त करून बाहेर बाेलावले. गुरुवारी सटाणा येथे झालेल्या भाजपच्या कार्यक्रमाला उपस्थिती का लावली म्हणून वरील सर्व दहाही जणांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याविषयी समजावून सांगत असताना रमेश बाेरनारे यांनी केस धरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादी भावजयीने तक्रारीत म्हटले आहे. पतींना दीपक बाेरनारे, अजिंक्य बाेरनारे व रंजित चव्हाण यांनी मारहाण केली. तसेच सटाणा येथे भेटलात तर जिवे मारण्यात येईल, अशी धमकी दिल्याचाही आराेप तक्रारीत करण्यात आला आहे. श्राद्धाच्या घरातील नातेवाइकांनी भांडण आणि मारहाण करताना साेडवासाेडव केली. त्यानंतर रुग्णालयात जाऊन तपासणी करून झाल्यानंतर वैजापूर पाेलिस ठाण्यात येऊन आमदार रमेश बाेरनारेंसह त्यांच्यासाेबतच्या इतर नऊ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही : भाजप महिला आघाडी
शिवसेनेचे लोकप्रतिनिधी व इतर साथीदारांनी भाजपच्या पक्षीय कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे त्यांच्या नात्यातील ४१ वर्षीय महिलेला बेदम मारहाण केली. या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी संबंधितावर गुन्हा नोंदवण्यासाठी विलंब केल्याचा आरोप भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रेखा कुलकर्णी, सविता कुलकर्णी, जिल्हा संघटक पुष्पा काळे, विधिज्ञ माधुरी अदवंत यांचे शिष्टमंडळ शनिवारी वैजापूर दौऱ्यावर आले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती यांची भेट घेऊन आरोपीवर विनयभंग केल्याचा गुन्हा नोंदवण्याची कारवाई करा, असे निवेदन त्यांनी दिले. महिलेला मारहाण करणाऱ्या आमदार महोदयांनी त्यांच्या पदाचा राजीनामा न दिल्यास त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा दिला.

बातम्या आणखी आहेत...