आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक:शिवसेनेचे माजी आमदार साबणे यांना पक्ष प्रवेशापूर्वीच भाजपची उमेदवारी

नांदेड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे माजी आमदार सुभाष पिराजी साबणे हे भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी त्यांची उमेदवारी रविवारी दुपारी अधिकृतरीत्या जाहीर केली. काँग्रेसचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे रिक्त जागेवर ३० ऑक्टोबर रोजी ही पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेसकडून रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता.४) भाजपचा देगलूरमध्ये एक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातच माजी आमदार साबणे हे आपल्या असंख्य समर्थकांसह पक्षात प्रवेश करणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर हे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी बिलोलीकडे जात असताना नरसी येथे श्रावण पाटील भिलंवडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या वेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे भाजपचे संभाव्य उमेदवार माजी आमदार सुभाष साबणे हे उपस्थित होते. दरम्यान, रविवारी साबणे यांनी ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर यांची नांदेड येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी उभय नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली, मात्र त्याचा तपशील मिळू शकला नाही.

फडणवीस यांच्यासोबत चर्चा : नरसी येथे श्रावण पाटील यांच्या निवासस्थानी साबणे आणि देवेंद्र फडणवीस, दरेकर, खासदार चिखलीकर यांच्यासह भाजपच्या मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत बंद खोलीत विशेष चर्चा झाली. त्यानंतर माजी आमदार साबणे यांच्या उमेदवारीवर केंद्रीय भाजप कार्यालयाकडून अधिकृत पत्रक काढून शिक्कामोर्तब झाले.

बातम्या आणखी आहेत...