आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा; अध्यक्षपदी नितीन पाटील यांची बिनविरोध निवड, अर्जुन गाडे उपाध्यक्ष

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: संतोष देशमुख
  • कॉपी लिंक
  • बिनविरोध करण्यासाठी सर्व 20 संचालकांनी एकत्रित येऊन अतिथी हॉटेलमध्ये बैठक

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांनी अर्ज दाखल करून सर्वांना धक्का दिला होता. पण ऐनवेळी त्यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे पाटील यांचा मार्ग मोकळा झाला. उपाध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली होती. मतदान घ्यावे लागले. यात अर्जून गाडे यांचा ६ मतांनी दणदणीत विजय झाला.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला सोमवारी सकाळी ११ वाजता सुरूवात झाली होती. अध्यक्ष पदासाठी नितीन पाटील व मंत्री संदीपान भुमरे यांनी अर्ज दाखल केला होता. यामुळे राजकीय नाट्य चांगले तापले होते. दीडतास हा गोंधळ सुरू होता. भुमरे ऐकत नसल्याने मंत्री सत्तार यांनी निवडणूक लढविण्यासाठी अर्ज मागवला होता. पण भुमरे यांनी स्वत अर्ज मागे घेतला. त्यामुळे नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्षपदासाठी पाच जणांनी अर्ज दाखल केले होते.

नितीन पाटील व अर्जून गाडे
नितीन पाटील व अर्जून गाडे

त्यापैकी दिनेश परदेशी आप्पासाहेब पाटील यांनी माघार घेतली तर जगन्नाथ काळे, कृष्णा पाटील डोणगावकर आणि अर्जुन गाढे निवडणूक रिंगणात उतरले होते. डोणगावकर यांनी पॅनल सोडून शिवबंधन बांधले. यामुळे काळे यांचे संचालक नाराज झाले होते. तर शिवबंधन बांधून ही त्यांनी बंडखोरी करून अर्ज भरला व म्हणून सत्तार यांचा रोष ओढवून घेतला. यामुळे दुपारी एक वाजे दरम्यान झालेल्या निवडणुकीत डोणगावकर पराभूत झाले. गाडे यांचा विजय झाला.

अतिथी हॉटेलमध्ये खलबते
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व २० संचालकांनी एकत्रित येऊन अतिथी हॉटेलमध्ये बैठक घेतली. बैठकीत नितीन पाटील अध्यक्ष तर अर्जुन गाडे यांच्या नावावर विचार विनिमय झाला. पण एकमत होऊ शकले नाही. आमदार अंबादास दानवे बैठकीला उशिरा आले होते. त्याचे पडसाद निवडणूक दरम्यान स्पष्ट पणे उमटले.

कृष्णा अन् अर्जून मध्ये लढत
उपाध्यक्ष पदासाठी जगन्नाथ काळे, कृष्णा डोणगावकर, अर्जुन गाडे, अप्पासाहेब पाटील, दिनेश परदेशी यांनी अर्ज भरले होते. यापैकी अप्पासाहेब व दिनेश यांनी अर्ज मागे घेतला. तर जगन्नाथ काळे यांनी कृष्णा डोणगावकर यांना धडा शिकविण्यासाठी ऐनवेळी अर्जून यांना समर्थन दिले. त्यामुळे अर्जून यांना १३ मते मिळाली व विजयी झाले. तर कृष्णा यांना केवळ ७ मते मिळाली.

भुमरे, दानवे विरूद्ध सत्तार जिल्हा बॅंक निवडणुकीत
सत्तार, काळे, झांबड एकत्र आले. तर भुमरे, दानवे विरूद्ध सत्तार असा संघर्ष पायथ्याला मिळाला. बंडखोरीचा मार्ग पत्करणारे डोणगावकर यांना भुमरे, दानवे यांनी पाठिंबा दिला. यामुळे त्यांना ७ मतापर्यंत मजल मारता आली.

तीन कोरोनाग्रस्त
संचालक किरण डोणगावकर व अॅड देवयानी डोणगावकर यांना कोरोना चाचणीतून बाधित झाल्याचे निष्पन्न झाले. यामुळे त्यांनी पीपीई किट घालून मतदानाचा हक्क बजावला. तर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ मुकेश बारहाते यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अनिल दाबशेडे, सोन्ने आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया पार पडली.

गद्दारांना धडा शिकवणार
बिनविरोध अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडले जावे यासाठी पूर्ण प्रयत्न केला. पण काही गद्दारांमुळे उपाध्यक्ष पदासाठी दुर्दैवाने निवडणूक झाली. यात त्यांचा पराभव झाला आहे. आगामी निवडणुकीत याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील असा इशारा मंत्री अब्दूल सत्तार यांनी दिला आहे. तसेच हरिभाऊ बागडे, सतीश चव्हाण, डॉ. कल्याण काळे, सुभाष झांबड यांनी सहकार्य केले. यामुळे विजय सुनिश्चित झाल्याचे सत्तार म्हणाले.

भगवा फडकला
जिल्हा बॅंकेवर प्रथमच शिवसेनेचे अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड झाली आहे. मतभेद झाले तरी भगवा फडकल्याचा आनंद शिवसेनेच्या वतीने पेडे भरवून व पुष्पहार घालून व्यक्त करण्यात आला. मात्र, यावेळी आमदार तथा जिल्हा प्रमुख दानवे व मंत्री संदीपान भुमरे गैरहजर होते.

शेतकरी हितासाठी काम करू
निवडणुकीत जे राजकारण आले ते आम्ही कामकाजात येऊ देणार नाही. शेतकरी व ग्राहकहित लक्षात ठेवून महाराष्ट्रात सर्वोच्च यशस्वी बॅंक व्हावी यासाठी आगामी काळात काम करणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन पाटील यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...