आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न रोटीचा:लॉकडाऊनमध्येही शिवभोजनच्या 33 टक्के थाळ्या रिकाम्या पडून; मोठा बोलबाला, पण ग्राहकांकडून प्रत्यक्षात सामान्य प्रतिसाद

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेमचेंजर योजनेच्या मंजूर क्षमतेपेक्षा कमीच अन्नाची विक्री

लॉकडाऊनमुळे रोजी मंदावली तरी रोटी गमावू देणार नाही, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळी विनामूल्य देण्याची घोषणा केली. मात्र, राज्यातील गरीब, वंचित जनता रोटीसाठी शिवभोजनावरच अवलंबून नसल्याचे गेल्या वर्षभरातील आकडेवारीतून दिसून येते. त्याचे कारण म्हणजे वर्षभरात एकदाही शिवभोजनच्या थाळ्या पूर्ण क्षमतेने विकलेल्या नाहीत. अनेकदा तर ३३ टक्क्यांपर्यंत थाळ्या पडून राहिल्या. गुरुवारी विनामूल्य थाळ्या देण्याच्या पहिल्या दिवशीही ३० टक्के थाळ्यांची विक्री झालेली नाही, हे विशेष.

गरीब आणि गरजू व्यक्तींना १० रुपयांत जेवण देणाऱ्या शिवभाेजन थाळी योजनेची २६ जानेवारी २०२० पासून सुरुवात झाली. जिल्हा मुख्यालय, जिल्हा रुग्णालय, बसस्थानक, रेल्वेस्टेशन परिसर, बाजार समित्या अशा गर्दीच्या भागात शिवभोजन केंद्रे आहेत. एका केंद्राला ७५- २०० थाळ्या देण्याची तरतूद आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये १० ची थाळी ५ रुपयांत करण्यात आली. यंदाच्या लॉकडाऊनमध्ये ती मोफत मिळणार आहे. गरीब आणि गरजूूंचे पोट भरणारी गेमचंेजर याेजना म्हणून याकडे बघितले जाते. प्रत्यक्षात पोटासाठी नागरिकांकडे अन्य पर्याय असल्याचे दिसून येते.

शिवभोजन थाळीची स्थिती
तारीख मंजूर वितरित टक्के
१५ मे २०२० १३५७५५ ११६१९६ ८५.५९
१५ जून २०२० १३५७५५ १०४०७९ ७६.६६
१५ जुलै २०२० १३५७५५ ९७७१६ ७१.९७
१५ ऑगस्ट २०२० १३५७५५ ९८४३६ ७२.५१
१५ डिसें. २०२० १३५७५५ ९८०९३ ७२.५१
१५ जाने. २०२१ १३५७५५ ९५४३६ ७०.३०
१५ फेब्रु. २०२१ १३५७५५ ९४२२७ ६९.४०
१५ मार्च २०२१ १३५७५५ ९४६६७ ६९.७३
१ एप्रिल २०२१ १३५७५५ ९३९९८ ६९.२४
१४ एप्रिल २०२१ १३५७५५ ९२२६३ ६७.९६
१५ एप्रिल २०२१ १३५७५५ ९६३५२ ७०.९७

विनामूल्यकडेही पाठच
जानेवारी २०२१ मध्ये रुग्णसंख्येत लक्षणीय कमतरता आल्यानंतर ३१ टक्क्यांपर्यंत शिवथाळ्या रिक्त राहू लागल्या. १४ एप्रिल रोजी ३३ टक्के थाळ्या विकल्या नाहीत. विनामूल्यच्या पहिल्या दिवशीही राज्यात ३९,४०२ (३० टक्के) थाळ्यांना ग्राहक मिळाला नाही.

पुढे प्रतिसाद मिळेल
प्रशासनातील एक अधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाले, पहिल्या लॉकडाऊनमध्ये अनेक संस्था, संघटना अन्नवाटप करत होत्या. यामुळे गरजूंना शिवभोजन थाळीला पर्याय होता. यंदाच्या लॉकडाऊनमध्ये भोजन वाटप करणाऱ्यांची संख्या कमी आहे. यामुळे २-३ दिवसांत गरजूंची पावले शिवभोजनाकडे वळतील.

शिवभोजनची घसरगुंडी : सार्वजनिक पुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात शिवभोजन थाळीची ९६४ मंजूर केंद्रे आहेत. यापैकी ८८८ सुरू असून त्यांना दिवसभरात १,३५,७५५ थाळ्या विक्रीची परवानगी आहे. २६ जानेवारी २०२० पासून योजना सुरू झाली असली तरी २३ मार्च २०२० नंतर लॉकडाऊनच्या काळात त्यास गती मिळाल्याचे बोलले जाते. मात्र, रुग्णसंख्या वाढत असतानाही शिवभोजनच्या लाभार्थींची संख्या घटत चालली होती.

बातम्या आणखी आहेत...