आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवभक्तीत न्हाऊन निघाले शहर:सलग दुसऱ्या दिवशी क्रांती चौकात लाखो शिवप्रेमींचा जल्लोष; छत्रपतींना मानाचा मुजरा

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची यंदाची जयंती औरंगाबादकरांनी ऐतिहासिक ठरवली. क्रांती चौकात नव्याने उभारलेल्या महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यासमाेर दाेन दिवस लाखाे शिवप्रेमींच्या उत्साहाला अक्षरश: उधाण आले हाेते.“जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला हाेता. शनिवारी (१९ फेब्रुवारी) दिवसभर १ लाखाहून अधिक नागरिकांनी महाराजांना मानाचा मुजरा केला. यात महिलांची संख्याही लक्षणीय हाेती. गर्दी इतकी वाढली की, संध्याकाळनंतर क्रांती चौकाच्या दिशेने जाणारी वाहतूक वळवावी लागली. शुक्रवारी संध्याकाळपासूनच तैनात केलेला बंदोबस्त रविवारी मध्यरात्रीपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे.

पारंपरिक पोशाख, हाती भगवे झेंडे
क्रांती चौकात सकाळपासूनच शिवभक्तांनी गर्दी केली होती. महिला, तरुण, तरुणी, लहान मुले पारंपरिक पोशाखात आली हाेती. दुचाकी-चारचाकी वाहनांवर भगवा झेंडा लावलेला हाेता. या वर्षी शोभायात्रांना प्रशासनाने परवानगी दिली नव्हती. जयंती महोत्सव समितीने लावलेल्या डीजेवर संध्याकाळी हजारो तरुणांनी ठेका धरला. जयंती समितीने महिलांसाठी वेगळी व्यवस्था केली होती. अनेक कुटुंबे नवीन पुतळा पाहण्यासाठी आवर्जून आली होती. हजारो शिवभक्तांनी क्रांती चौक उड्डाणपुलावर थांबून छत्रपतींच्या पुतळ्याचे फोटो काढले. गारखेडा, टीव्ही सेंटर, मुकुंदवाडी, वाळूजसह शहरातील अनेक भागातही उत्सव जल्लाेषात साजरा करण्यात आला.

ग्रामीण भागातून आली हजारो कुटुंबे शहरात
ग्रामीण भागातील हजाराे कुटुंबे शिवरायांचा पुतळा पाहण्यासाठी आली हाेती. खासगी वाहने करून तरुण गटागटाने शहरात येत होते. स्मारकाचा फोटो काढण्यासाठी धडपड सुरू हाेती. पारंपरिक वेशभूषा, हातात भगवा ध्वज, डोक्यावर फेटे, कपाळावर चंद्रकोर असलेले तरुण-तरुणींच्या गर्दीने परिसर फुलून गेला हाेता.

आमच्यासाठी हे शिवतीर्थच!
क्रांती चौकातील शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा शहराचा अभिमान झाला आहे. एखाद्या तीर्थस्थानापेक्षा याला कमी लेखता येणार नाही. म्हणून याला ‘शिवतीर्थ’ असे म्हणावे. तशी मागणी आम्ही मनपाकडे करू. नंदकुमार घोडले, माजी महापौर, शिवसेना.

देशातील सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या शहरात उभा करण्यात आला. हे स्मारक मंदिराएवढेच पवित्र आहे. शिवप्रेमींसाठी हे शिवतीर्थच आहे. अभिजित देशमुख, उत्सव समिती अध्यक्ष

क्रांती चौक हे पहिल्यापासून शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. नवीन पुतळ्यामुळे याची भव्यता अजून वाढली आहे. हे स्मारक शहरातील शिवतीर्थच आहे. नीलेश राऊत, प्रदेश प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस.

शहिदांच्या बलिदानाचे स्मरण व्हावे म्हणून ‘क्रांती चौक’ असे नाव दिले आहे. त्याचाही मान ठेवला पाहिजे. त्यामुळे ‘क्रांती चौक शिवतीर्थ’ असे नाव असल्यास उचित राहील. दोघात योग्य समन्वय राहील. नामदेव पवार, राज्य सरचिटणीस, काँग्रेस

ज्याप्रमाणे एखाद्या तीर्थक्षेत्रातून स्फूर्ती मिळते तसेच शिवरायांच्या स्मारकाकडे पाहिले की तरुणांना नवीन ऊर्जा मिळते. त्यामुळे तरुणांसाठी हे शिवतीर्थच आहे. हे नाव या चौकाला सार्थ आहे. सुशील बोर्डे, प्रदेश सचिव, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस.

मराठी माणसांना प्रेरणा देणारे महाराष्ट्राचे दैवत या ठिकाणी विराजमान आहे. त्यामुळे या जागेला शिवतीर्थ म्हणण्याशिवाय पर्याय नाही. तशी मागणीदेखील आम्ही करणार आहोत. आशिष सुरडकर, शहराध्यक्ष, मनसे

बातम्या आणखी आहेत...