आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवाजी महाराज आणु छत्रपती शाहू महाराज या दोघांची बिरूदं जरी वेगळी असली तरी त्याचा अर्थ एकच आहे. दोघांनी सत्तेचा उपयोग समाज हितासाठी केला. जात, धर्म, संप्रदायाच्या पलीकडे जाऊन गुणवत्तेला महत्त्व देत बहुजन समाजाला सत्तेच्या केंद्रस्थानी आणले. प्रचलित असणारी राज्यसत्ता अभिजन केंद्री होती, पण शिव-शाहूंनी सत्तेचे विकेंद्रीकरण करत सत्तेचे बहुजनीकरण सुद्धा केले असे मत ज्येष्ठ कवी प्रा. इंद्रजीत भालेराव यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राजर्षी शाहू महाराज अध्यासन केंद्रातर्फे राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. 'शिवशाहूंचा वारसा' या विषयावर बोलताना प्रा. भालेराव म्हणाले, ‘शिवाजी महाराज हे दैवाचे गुलाम नव्हते. त्यांनी पंचांग पाहून युद्ध केले नाही. त्याचप्रमाणे राजर्षी शाहूंनीही मुहूर्तापेक्षा कृतीला जास्त महत्त्व दिले. कोणत्याही व्यक्तीचा जात-धर्म न पाहता त्यांच्या गुणवत्तेला महत्त्व दिले.
आपल्या राज्यामध्ये धर्मनिरपेक्ष तत्त्वाचा स्वीकार केला. परस्त्री, परधर्म, परधर्मग्रंथ आदींचा आदर केला. छत्रपती शिवराय हे जसे रयतेचे राजे म्हणून ओळखले जातात त्याप्रमाणे शाहूंनादेखील शेतीविषयी कळवळा होता. त्यांनी स्वतःच्या मुलाला राज सत्तेपेक्षा कृषी शिक्षणासाठी परदेशात पाठवले. करवीर संस्थानात कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल केले. म्हणून आजही कोल्हापूर जिल्हा कृषी क्षेत्रात अन्य प्रदेशांपेक्षा पन्नास वर्षे पुढे आहे. याचे सगळे श्रेय राजर्षी शाहूंचे आहे. तसेच शाहूंचे अस्पृश्यविषयक कार्यही अतुल्य आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षींचा अनुबंध हे पिता-पुत्रांप्रमाणे होते. जेव्हा बाबासाहेबांनी एका परिषदेसाठी शाहू महाराजांना पाचारण केले त्यावेळी राजर्षीना 'अस्पृश्यांचा राजा' अशा फलकाद्वारे हीनवण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी न डगमगता राजर्षींनी 'अस्पृश्यांचा राजा हा माझा गौरव आहे' असे ठामपणे म्हटले. यातूनच शाहू आणि शिवरायांच्या राज्यामध्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बहुजनांचा विचार कसा होता याचा प्रत्यय येतो असेही ते म्हणाले. कुलगुरूंनी अध्यक्षीय समारोप केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. प्रमोद येवले होते. कुलसचिव प्रा. जयश्री सूर्यवंशी, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक प्रा. संजय सांभाळकर, रासेयोचे संचालक प्रा. आनंद देशमुख व राजर्षी शाहू महाराज अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. कैलास अंभुरे यांची मंचावर उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. कैलास अंभुरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामप्रसाद वाव्हळ यांनी केले तर अजय पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी संघटनाच्या प्रतिनिधींसह कुलदीप चव्हाण, अमोल खरात, लोकेश कांबळे, सोनू गायकवाड, प्रा. रामेश्वर वाकणकर, गणेश शिंदे, केशर राठोड, काकासाहेब गरुड, बालाजी दळवे, दीपक जाधव, धर्मराज जाधव, आशिष काकडे, ज्ञानेश्वर अवचार, अश्विनी सोळंके, प्रेम पवार आदींनी विशेष परिश्रम घेतले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.