आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे. पैठण तालुक्यामधील बिडकीन येथे आदित्य यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पैठणमधून पाच वेळेस निवडून आलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार संदिपान भुमरे यांच्यावर आदित्य ठाकरेंनी टीका केली.
राजीनामा देऊन निवडून या!
आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसंवाद यात्रेला नाशिक व आता औरंगाबादमध्ये उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे. लोक शिवसेनेच्या मागे उभे असल्याचे या यात्रेतून स्पष्ट होत आहे. पैठणधील बंडखोर आमदारांना उद्देशून मला एवढेच सागांयचे आहे की, गद्दार म्हणूनच राहायचे असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा व पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे.
जनता तुमचा निर्णय घेईल
औरंगाबाद जिल्ह्यातील पाचही बंडखोर आमदारांना उद्देशून आदित्य ठाकरे म्हणाले, गेला तर जा, जिकडे आहात तिकडे सुखात राहा. पण पदाचे राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जा. मी तुमच्यावर आसूड उगारणार नाही, जनताच तुमचा निर्णय घेईल.
संदिपान भुमरे : स्लीप बॉय ते आमदार
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या पैठण येथील मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र सामनातूनही आ. संदिपान भुमरेंवर टीका करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, संत एकनाथ साखर कारखान्यावर 'स्लीप बॉय' म्हणून किरकोळ पगारावर नोकरी करणाऱ्या संदिपान भुमरे यांना शिवसेनेने अक्षरश: भरभरून दिले. सुरुवातीला कारखाना संचालक, पंचायत समितीचे सदस्य व उपसभापती असा त्यांचा राजकीय विकास झाला. तरीही संदिपान भुमरे यांना गद्दारीची अवदसा आठवली. संदिपान भुमरे यांच्या गद्दारीबद्दल पैठणकरांमध्ये संताप आहे, रोष आहे.
भुमरेंनी आपल्या घरातच पदे ठेवली
1995 मध्ये केवळ आणि केवळ शिवसेना या चार अक्षरी मंत्रामुळे पैठणकरांनी भुमरे यांना आमदार केले. त्यानंतर पाच वेळा धनुष्यबाण निशाणीवरच भुमरे आमदार झाले. जिल्हा बँक, नगर परिषद, मार्केट कमिटी, जिल्हा दूधसंघ व शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ आदी संस्थांवर फडकलेल्या भगव्या झेंड्याखाली त्यांना अमर्याद सत्तेची चव चाखायला मिळाली. एवढेच नव्हे तर मुलगा विलास भुमरे यांनाही जिल्हा परिषद सभापती म्हणून मानपान मिळाला. बंधू राजू भुमरे हे केवळ शिवसेनेमुळे तालुका कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती होऊ शकले. तसेच पुतणे शिवराज राजू भुमरे यांना तरुण वयातच पाचोड या मोठ्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद मिळाले. सामान्य शिवसैनिकाला बाजूला ठेवून सत्तेची सगळी पदे भुमरे यांनी आपल्या घरातच ठेवली, अशी टीका शिवसेनेने भुमरे यांच्यावर केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.