आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शहरातील जुना मोंढा भागातील मुरमुरा गल्लीत शुक्रवारी (ता.29) रात्री 11 च्या सुमारास शुल्लक कारणावरून दोन गटात राडा झाला. यामध्ये दोन्ही गटाकडून तलवारीने मारा झाला तर एका गटाकडून हवेत गोळीबार करण्यात आला. गोळीबाराच्या या घटनेमुळे शहर पुन्हा हादरले असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना ताब्यात घेतले आहे.
काही दिवसांपुर्वी जुना मोंढा भागात अशीच गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणातील मोरक्या विरूध्द मोका कायद्या अंतर्गत कारवाई केल्याने नांदेड शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे मोरके जेरबंद आहेत. त्यामुळे गुन्हेगारीच्या घटनांवर अंकुश आला होता. दरम्यान, शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास मोंढा भागातील मुरमुरागल्ली येथे टेहलसिंघ शाहू, सतवंतसिंघ शाहू, तेजवंतसिंघ शाहू दुसर्या गटाचे इरवंतसिंघ कडेवाले, मनप्रितसिंघ कडेवाले, दर्शनसिंघ कडेवाले या दोन गटामध्ये शुल्लक कारणावरून वाद झाला. दोन्ही गटाकडून तलवारी काढण्यात आल्या. यामध्ये 5 जण जखमी झाले असून बचाव करण्यासाठी टेहलसिंघ शाहू यांनी त्यांच्याकडील बंदुकीतून 6 राऊंड फायर केले. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती. रात्रीच्या सुमारास घटना घडल्यामुळे शहरामध्ये याची माहिती वार्या सारखी पसरली.
6 जणांना घेतले ताब्यात
पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी फौजफाट्यासह घटनास्थळाकडे धाव घेवून पाहणी केली व 6 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरूध्द वजिराबाद ठाण्यात दोघांच्या तक्रारीवरून परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाला आहे.
सखोल चौकशी करणार : पोलिस निरीक्षक भंडरवार
जिल्ह्यात काही पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून वजिराबाद ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांची बदली झाली.त्यांच्या जागेवर जगदीश भंडरवार हे आले असून त्यांनी शनिवारी (ता.३०) पदभार स्विकारला. दरम्यान, मुरमुरा गल्लीतील गोळीबार प्रकरणाची सखोल चौकशी करणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.