आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:आस्थापना टॅक्सविरोधात व्यावसायिक आक्रमक; 50 हजार दुकानदारांना रस्त्यावर उतरवून आंदोलन करू - व्यापारी महासंघ

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महानगरपालिका प्रशासनाने उत्पन्न वाढवण्यासाठी व्यापाऱ्यांवर आस्थापना कर लादण्याचा घाट घालत आहे. याला व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध करत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी ते मुख्यमंत्री व केंद्रिय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे तक्रार केली. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे व्यापारी आक्रमक झाले आहेत. या विरोधात ५० हजार व्यापारी रस्त्यावरून उतरून आंदोलन करतील, असा इशारा जिल्हा व्यापारी संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण राठी यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

शहरातील व्यापाऱ्यांना आस्थापना कर लावण्यासाठी मनपा प्रशासनाने खासगी एजन्सी नियुक्त केली आहे. त्या एजन्सीने आस्थापनांचे(दुकाने, व्यापारी संकुले) सर्वेक्षण केले. त्याचे सुमारे ७० लाखांचे बील मनपाला सादर केले आहे. तर व्यापाऱ्यांना कमीत कमी तीनशे आणि जास्तीत जास्त तीस हजार रूपयांपर्यंत आस्थापना कर लावण्याची तरतूद केली जात आहे. अगोदरच पाणी पुरवठा, मालमत्ता आदी कर असताना वरतून आस्थापना कर कशासाठी लावता? असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित करून तो रद्द करावा, यासाठी सातत्याने लढा देत आहेत.

पालकमंत्री, सहकार मंत्री, आमदार, खासदार यांना आस्थापना कर रद्द करावा, यासाठी निवेदन दिली. एवढच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रिय मंत्री डॉ. भागवत कराड यांची भेट घेऊन कर रद्द करण्यासाठी साकडे घातले. मात्र, त्याचा अद्याप काहीच उपयोग झालेला नाही. दुसरीकडे कर लादण्यासाठी प्रोसेस पूर्ण केली जात असल्याने व्यापारी आक्रमक झाले असून सर्वच्या सर्व व्यापारी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

नवीन आयुक्तांपुढे पहिले आव्हान

व्यापाऱ्यांचा आस्थापना कराचा प्रश्न सोडवण्याचे आव्हान नवीन आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासमोर असेल. ते कर लावतात की रद्द करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तर नवीन आयुक्त व पालकमंत्री, लोकप्रतिनिधींची पुन्हा एकदा भेट घेऊन कर रद्द करण्याबाबत चर्चा करू. निर्णय झाला नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यावर ठाम असल्याचेही राठी म्हणाले.