आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसगावची श्रद्धा ऑलम्पिकसाठी सज्ज:11 राष्ट्रीय 3 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत घेतली मोठी झेप, मध्यप्रदेशात घेत आहे प्रशिक्षण

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद शहरापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तिसगावच्या श्रद्धा कडूबाळ चोपडे या 17 वर्षीय खेळाडूने थायलंड, बँकॉक येथे झालेल्या कॅडेट व ज्युनिअर आशियाई स्पर्धेत भारत देशाचे प्रतिनिधित्व करत देशासाठी कांस्य पदक पटकावले. तिच्या यशाचे श्रेय ती आजवर प्रशिक्षण देणाऱ्या मार्गदर्शकांना तर देतेच शिवाय सर्वसामान्य घरातील व ग्रामीण भागातील खेळाडूंना 'खेलो इंडिया खेलो' च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या केंद्र सरकारचे आभार व्यक्त करते.

प्रतिकोल्हापूर म्हणून ओळखले जाणारे 'तिसगाव' कुस्तीचे माहेरघर म्हणून मराठवाड्यात सुप्रसिद्ध आहे. याच तिसगावच्या मातीतून छत्रपती पुरस्कार, उपमहाराष्ट्र केसरी पुरस्कार तथा राष्ट्रपती पुरस्कार खेळाडूंना मिळालेला आहे. स्वतः ज्यूदोचे राष्ट्रीय खेळाडू असणाऱ्या व खेळाडूंना प्रशिक्षण देणाऱ्या वडिलांना बघत श्रद्धा मोठी झाली. हळूहळू तीपण व्यायाम करू लागली. शालेय वयातच श्रद्धाने तनवाणी इंग्लिश स्कूलमध्ये शैलेश कावळे यांच्याकडून ज्यूदोचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यासोबत ती बजाजनगर येथे भीमराज राहणे यांच्याकडेही प्रशिक्षण घेऊ लागली.

लॉकडाऊनमध्ये मॅटवर प्रशिक्षण

याच दरम्यान बीड येथे झालेल्या सबज्युनिअर राज्यस्तरीय स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले. पुढे भीमराज राहणे, विजय धिमन, मधूश्री देसाई (पुणे) यांच्याकडून प्रशिक्षण घेत तिने अनेक राष्ट्रीय स्पर्धेत स्वतःला सिद्ध करत पदके मिळवत गेली. याच दरम्यान लॉकडाऊन लागले. इतर मुलींप्रमाणे ती सुद्धा घरी आली. मात्र, तिने व तिच्या वडिलांनी लॉकडाऊन काळात घरातच मॅटवर प्रशिक्षण सुरू केले. अंगणात व्यायाम तर घरात वडिल व लहान भाऊ शंभू याच्यासोबत ती सराव करू लागली.

भारताला कांस्यपदक मिळवून दिले

तिला पुणे येथे प्रशिक्षण देणाऱ्या मधूश्री देसाई यांच्याकडून ऑनलाइन प्रशिक्षण मिळतच होते. याच सरावाच्या जोरावत सन 2021 मध्ये लेबनॉन देशात घेण्यात आलेल्या कॅडिट व ज्युनिअर आशियाई स्पर्धेत तिने यश संपादन केले. पुढे तिची निवड कॅडेट व ज्युनिअर स्पर्धा 2022 करिता होणाऱ्या बँकॉक, थायलंड करिता झाली. त्यासाठी श्रद्धाला आता मध्यप्रदेश येथील नामांकित भारतीय खेल प्राधिकरण खेलो इंडिया सेंटर, भोपाळ याठिकाणी बोलावण्यात आले. तिथे ती अर्जुन पुरस्कारप्राप्त यशपाल सोलंकी यांच्यासह इतर 16 प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली प्रशिक्षण घेऊ लागली. याच दरम्यान 2022 मध्ये बँकॉक येथे झालेल्या स्पर्धेत 48 किलो वजन गटात तिने भारताला कांस्यपदक मिळवून देत सर्वांच्या मनात ऑलम्पिकसाठी ज्योत प्रज्वलित केली.

आजवर यांचे मिळाले मार्गदर्शन

श्रद्धाच्या यशस्वी वाटचालीत महाराष्ट्रराज्य ज्यूदो तांत्रिक सचिव दत्ता आफळे, सचिव अतुल बामनोतकर, विश्वजित भावे, अजित मुळे, गणेश शेटकर, भीमराज राहणे, विजय धिमन आदींचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...