आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाच्या वाढत्या मृत्युसंख्येचे विश्लेषण:आजार अंगावर काढणे, ऑक्सिजनमध्ये घट; वाढता एचआरसीटीचा‌ स्कोअरच ठरत आहे मृत्यूचे कारण

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घाटीत १ ते २४ मार्चदरम्यान कारोनाचे 1374 रुग्ण दाखल झाले. यापैकी 608 जण बरे झाले तर 208 जणांचा मृत्यू. मृत्यूंचे प्रमाण सुमारे 15%
  • फुप्फुसातील संसर्ग जास्त व प्रतिकारशक्ती कमी झाली की व्हेंटिलेटर लावूनही रुग्ण वाचवणे होते जिकिरीचे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णसंख्या जशी झपाट्याने वाढत अाहे तसे मृत्यूंचे प्रमाणही पहिल्या लाटेच्या तुलनेत गंभीर हाेताना दिसत अाहे. केवळ मार्च महिन्यातील २५ दिवसांत काेराेनाने जिल्ह्यातील २३७ जणांचे बळी घेतले. त्यापैकी २० ते २५ मार्च या सहा दिवसांतच शंभर जणांचा मृत्यू झाला. केवळ तीन कारणांमुळे इतकी गंभीर परिस्थिती निर्माण हाेत असल्याचे डाॅक्टरांचे म्हणणे अाहे. त्यात अाधी अाजार अंगावर काढणे व नंतर प्रकृती अतिगंभीर झाल्यावरच अॅडमिट हाेणे, शरीरातील अाॅक्सिजनचे प्रमाण खूपच खालावल्यानंतर किंवा फुप्फुसांमध्ये संसर्गाचे प्रमाण धाेकादायक पातळीपर्यंत जाईपर्यंत दुर्लक्ष करणे या कारणांमुळेच सर्वाधिक मृत्यू झाल्याचे घाटीतील डाॅक्टरांच्या पाहणीतून समाेर अाले अाहे.

सर्वच रुग्णालयांतून रुग्ण गंभीर झाला की त्याला घाटीत पाठवले जाते. येथील डाॅक्टर शर्थीचे प्रयत्न करून त्याला वाचवण्याचा प्रयत्नही करतात, मात्र अनेकदा परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर रुग्ण दाखल हाेत असल्याने त्यांचाही नाइलाज हाेताे. याच कारणामुळे काेराेनाेचे सर्वाधिक मृत्यू घाटीत नाेंदले जातात. घाटीच्या अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर म्हणाल्या, ‘अाॅक्सिजन लेव्हल ९० ते ९५ च्या पुढे असेल तर प्रकृती उत्तम असते. मात्र ही लेव्हल २५ ते ६० टक्क्यांपर्यंत घसरल्यानंतर रुग्ण घाटीत दाखल हाेत अाहेत. त्यामुळे मृत्यूंचे प्रमाणही वाढत आहे. सुरुवातीला थाेडा त्रास हाेत असताना रुग्ण दुर्लक्ष करतात अन‌् अखेरच्या टप्प्यात अॅडमिट हाेतात. त्यामुळे त्यांना वाचवणे कठीण जाते. काेराेनाग्रस्तांना डायरियाचीही लक्षणे अाता जास्त दिसू लागली अाहेत.

सुपरस्पेशालिटीचे विशेष कार्याधिकारी डॉ. सुधीर चौधरी यांनी सांगितले की, ‘अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेतात. मात्र प्रकृती गंभीर झाल्यानंतर अापल्याकडे ‘डेथ’ नकाे म्हणून खासगी रुग्णालये त्याला घाटीत रेफर करतात. अशा रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल २५ ते ४० टक्क्यांपर्यंत घसरलेली असते. सीटी स्कॅनमध्ये फुप्फुसातील संसर्गाचा स्काेअरही (एचअारसीटी) १५ पेक्षा अधिक असताे. त्यामुळे मृत्यूदेखील वाढत आहेत. फुप्फुसात संसर्ग जास्त असेल आणि प्रतिकारशक्ती कमी असेल अशा रुग्णांना वाचवणे कठीण जाते.’

एका ३० वर्षांच्या रुग्णाला लूज मोशनचा त्रास होता. मात्र त्याने अाजार अंगावर काढला. आठ दिवसांनंतरही बरे वाटत नसल्याने तो अॅडमिट झाला होता. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह अाली अन‌् त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. असे अाजार अंगावर काढणे जिवावर बेतू शकते. त्यामुळे त्रास झाला की लगेच डाॅक्टरांना दाखवावे,’ असे अावाहन डाॅ. येळीकर यांनी केले.

अातापर्यंतच्या रुग्णांत सर्वाधिक संसर्गचा स्काेअर २४ पर्यंत
ग्रामीण भागातील लाेक अंगावर अाजार काढत असल्याने त्यांचे जीव धाेक्यात येत अाहेत. बजाजनगरातील असेच एक उदाहरण नुकतेच घाटीत समाेर अाले. येथील एक ७० वर्षीय महिला शुक्रवारी संध्याकाळी भरती झाली. सीटी स्कॅन केल्यानंतर तिच्या संसर्गाचे प्रमाण २४ इतके नाेंदले गेले. जे अातापर्यंत घाटीत अालेल्या सर्वच रुग्णांपैकी सर्वाधिक अाहे. ती महिला अाता व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत अाहे.

घाटीत तज्ज्ञांच्या मदतीने दर आठवड्याला होते मृत्यूंचे ऑडिट
घाटीत अनिल जोशी तसेच एल. एस. देशमुख यांच्या माध्यमातून दर आठवड्याला काेराेना रुग्णांच्या मृत्यूचे ऑडिट केले जाते. या अभ्यासाअंती उशिरा अॅडमिट हाेणे, ऑक्सिजन कमी होणे, एचअारसीटीचा वाढलेला स्कोअर हीच प्राधान्याने कारणे समाेर येत असल्याचे देशमुख यांनी सांगितले. घाटीत आजवर ५८८३ रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी ११९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रुग्णांना पाेटदुखी, डायरियासारखी लक्षणेही
धूत हॉस्पिटलचे डाॅ. प्रसाद मुंडे यांनी सांगितले, ‘कोरोनाचे रुग्ण वाढले असले तरी पूर्वीच्या तुलनेत मृत्यू कमी आहेत. ज्यांचे वय ६० पेक्षा अधिक अाहे, बीपी, मधुमेहसारख्या सहव्याधी अाहेत अशाच लोकांचे मृत्यू होत आहेत. ऑक्सिजन लेव्हल ५० ते ६० पर्यंत घसरल्यानंतर भरती झालेल्यांच्या मृत्यूचे प्रमाणच जास्त अाहे. कोरोनात सर्दी, ताप, खोकला यापलीकडेही पोटदुखी, लूज मोशन अशी लक्षणेही दिसत आहेत.

घाटीतील मृत्यू
20 मार्च 16
21 मार्च 09
22 मार्च 23
23 मार्च 23
24 मार्च 20

बातम्या आणखी आहेत...