आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकल्पाला स्टेट ऑफ आर्ट दर्जा:‘सीमेन्स’ औरंगाबादेतून करणार रेल्वे बोगीचे उत्पादन; दरवर्षी 200 बाेगींची होणार निर्यात

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातून उद्योग पळवले जात असल्याच्या आरोपावरून राजकीय वादळ उठलेले असताना आता औरंगाबादच्या उद्योग विश्वासाठी आनंदाची बातमी आहे. सीमेन्स ही आंतरराष्ट्रीय दर्जाची कंपनी शेंद्रा डीएमआयसीतील प्रकल्पातून रेल्वे बोगीचे उत्पादन करणार आहे. कंपनीचे एमडी तथा सीईओ सुनील माथूर यांनी ही घोषणा केली. विशेष म्हणजे या प्रकल्पाला ‘स्टेट ऑफ आर्ट’चा दर्जा दिला जाणार असून यातून दरवर्षी २०० बोगींची निर्यात करण्याचे उद्दिष्टही कंपनीने ठेवले आहे. या प्रकल्पातून पॅसेंजर कोच, लोकोमोटिव्ह इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट्स, ट्राम, मेट्रो डब्यांची निर्मिती केली जाणार आहे.

सीमेन्स कंपनीचे वाळूज एमआयडीसीत तीन प्लँट असून त्यातून इलेक्ट्रिक कंपोनंटची निर्मिती केली जाते. तर शेंद्रा डीएमआयसीत कंपनीने यापूर्वीच एक प्लँट टाकलेला आहे. त्यातून आता रेल्वे कोचची निर्मिती केली जाईल. त्या दृष्टीने काम सुरू झाले आहे. रेल्वे बोगी निर्मितीसाठी औरंगाबाद हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे या प्रकल्पाची सुरुवात या शहरातून केली जाणार आहे. या कंपनीत उत्पादित केले जाणारे कोच हे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाठवले जातील. जगभरातील मागणी पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे. या प्रकल्पातून तयार होणाऱ्या रेल्वे बोगीचे डिझाइन विशेष असेल. आरामदायी प्रवासाचा अनुभव या बोगी देतील. देखरेखीसाठी आणि दुरुस्तीसाठी या बोगी सोप्या असतील, असे माथूर यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले.

मराठवाड्यातील दुसरा प्रकल्प यापूर्वी रेल्वे खात्याने लातूरमध्ये कोच फॅक्टरी सुरू केली होती, पण अद्याप त्यातून उत्पादनास सुरुवात झालेली नाही. लवकरच या प्रकल्पातूनही बोगीची निर्मिती केली जाणार आहे. वंदे भारत रेल्वेच्या विशेष डब्यांच्या बांधणीसाठी लातूर येथील कारखान्याला मंजुरी मिळाली आहे. कंत्राटदार नियुक्त झाल्यानंतर प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात होईल. दर महिन्याला चार गाड्यांची बांधणी पूर्ण होईल,’ अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली होती. त्यापाठोपाठ आता मराठवाड्यातील दुसरा रेल्वे कोच कारखाना औरंगाबादेत उभा राहत आहे.

बातम्या आणखी आहेत...