आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:उद्योग जगतातील 80% कंपन्यांकडून 10%पर्यंत पगारवाढीचे संकेत

औरंगाबाद / महेश जोशीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना काळातील आयटी, फार्मास्युटिकल्स, ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांत सर्वाधिक ‘इन्क्रीमेंट’ शक्य

कोरोनाच्या संकटात उद्योग जगतातील कर्मचाऱ्यांना यंदा १० टक्क्यापर्यंत “इन्क्रीमेंट’ मिळणार आहे. उद्योगांचे कामकाज पूर्वीच्या तुलनेत ८० टक्क्यांपर्यंत सामान्य झाले आहे. दुसऱ्या लाटेचा फटका असला तरी तो मागील वर्षाएवढा मोठा नाही. शिवाय कर्मचारी टिकवण्याचे आव्हान असल्याने जवळपास ८० टक्के उद्योगांनी पगारवाढीचा निर्णय घेतला आहे. आयटी, फार्मा, ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिकमध्ये घसघशीत पगारवाढीचे संकेत मिळताहेत. कंपनीच्या, उद्योगांच्या वर्षभराच्या कामगिरीवर कर्मचाऱ्यांची पगारवाढ अवलंबून असते. यंदा फेब्रुवारीत एकूण क्षमतेच्या ८५% तर मार्चमध्ये ८३% उत्पादन झाले. एप्रिल २०२० नंतर प्रथमच डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या तीन महिन्यांच्या मंथ ऑन मंथ कामगिरीत सुधारणा दिसली. यामुळे उद्योगांनी पगारवाढीचा निर्णय घेतल्याचे उद्योजकांची संघटना उद्योग भारतीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवी वैद्य यांनी सांगितले.

४३% कंपन्या नवीन भरतीही करणार; उद्योगांचे कामकाज पूर्वीच्या तुलनेत ८० टक्क्यापर्यंत आले पूर्वपदावर
विलीज टॉवर वॅटसन इंंडियाच्या “सॅलरी बजेट प्लॅनिंग सर्व्हे’नुसार २०२१ मध्ये नाेकरदारांचे वेतन सरासरी ६.४% वाढेल. ३७ % कंपन्यांनी १२ महिने सकारात्मक राहतील, असे सांगितले. १०% कंपन्या नवीन नोकरभरती करतील. फार्मा, कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, रिटेल व आयटीत ८% , उत्पादन आणि वित्त क्षेत्रात ७%, बीपीओ ६% तर ऊर्जा क्षेत्रात ४.६ % पगारवाढ होईल. हॉस्पिटॅलिटी, पर्यटन, हाॅटेल व विमान वाहतूक क्षेत्रात पगारवाढीची चिन्हे नाहीत.

कर्मचारी टिकवण्याचे आव्हान : उद्योग भारतीचे प्रदेशाध्यक्ष रवी वैद्य म्हणाले, आता उद्योग पूर्वपदावर येत आहेत. यामुळे ८ ते १०% वाढ दिली जाईल. तसे न केल्यास कर्मचारी टिकणार नाहीत. एका कंपनीचे एमडी म्हणाले, चांगली वाढ न मिळाल्यास कर्मचारी दुसरीकडे जातील. नवीन कर्मचारी तयार करण्याचा खर्च जास्त राहील.

- कोर्न फेरीच्या “सॅलरी इन्क्रीमेंट अॅँड रिवाॅर्ड सर्व्हे ट्रेड्स’ नुसार २०२१ मध्ये सरासरी ६.९% पगारवाढ होईल.

- जीनियस कन्सल्टंटच्या सर्व्हेनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीला फटका बसेल. पण वेतनवाढीवर परिणाम होणार नाही. १२०० पैकी ५९% कंपन्यांनी ५ ते १० % पगारवाढीचे संकेत दिले. २०% कंपन्यांनी ५ % पेक्षा कमी, तर २१ % कंपन्यांनी पगारवाढ करणार नसल्याचे सांगितले. ४३% कंपन्या नवीन भरतीही करणार आहेत. सर्वाधिक पगारवाढ आयटी, फार्मा, बँकिंग, मेडिकल इक्विपमेंट व टेेलिकॉम क्षेत्रात असेल.

- डिलॉइट टच तोहमस्तू इंडियाच्या सर्वेक्षणानुसार यंदा ७.३ टक्क्यांपर्यंत पगारवाढ होईल. २० % कंपन्यांनी दोन आकडी पगारवाढीचे संकेत दिले. सर्वाधिक वाढ लाइफ सायन्सेस, फार्मा,आयटीमध्ये असेल. पर्यटन, हॉस्पिटॅलिटी, इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिन्युएबल एनर्जी क्षेत्रात पगारवाढ होणार नाही. या क्षेत्रात नोकऱ्या टिकवण्याचे आव्हान राहील.

- ग्लाेबल प्रोफेशनल सर्व्हिसेस एओन पीएलसीच्या सर्वेक्षणानुसार यंदा ७.७ टक्क्यांपर्यंत पगारवाढ होईल. ८८% कंपन्या पगारवाढ देतील. १२.५% कंपन्या पगारवाढ देण्याच्या स्थितीत नाहीत. ३४% कंपन्या ८ ते १०% तर ३०.६% कंपन्या ५ ते ८% वाढ देतील. ई-कॉमर्समध्ये १०.१%, आयटी ९.७%,आयटीईएस ८.८% फार्मात ८% पगारवाढ मिळेल.

बातम्या आणखी आहेत...