आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉमनवेल्थ बुद्धीबळ चॅम्पियनशीप स्पर्धा:औरंगाबादची वुमन इंटनॅशनल मास्टर साक्षी चितलांगेला रौप्यपदक

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादची युवा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू साक्षी चितलांगनेे पुन्हा एकदा भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. वासकादुवा (श्रीलंका) येथे नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये वूमन इंटरनॅशनल मास्टर साक्षी दिनेश चितलांगेने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. तिच्या या यशाबद्दल श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुनावारदेना यांच्या हस्ते पीएम हाऊसमध्ये साक्षीला रौप्यपदक व रोख पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी कॉमनवेल्थ चेस असोसिएशनचे अध्यक्ष भरतसिंग चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत सात देशातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या वर्षी मार्च महिन्यात भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून साक्षीने कॉमनवेल्थ चेस चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात महिला संघात स्थान मिळवले होते. साक्षी भारताची आघाडीची खेळाडू आहे. तिच्या यशाबद्दल महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

अर्ध्या गुणांनी सुवर्णपदक हुकले :

स्पर्धेत अखेरच्या फेरीपर्यंत साक्षी महिला गटात पहिल्या स्थानावर होती.‌ मात्र, शेवटच्या डावात ग्रँडमास्टर इनियन पी. कडून पराभव स्विकारावा लागल्याने तिला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तिचे अवघ्या अर्ध्या गुणांनी सुवर्णपदक हुकले. आतापर्यंत देशासाठी 11 आंतरराष्ट्रीय पदक मिळविणाऱ्या साक्षीने कॉमनवेल्थ बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये एकूण पाच पदके मिळवली आहेत. याआधी कॉमनवेल्थ स्पर्धेत तिने 2015 ते 2018 मध्ये सलग चार पदके जिंकली होती.

साक्षी वुमन ग्रँडमास्टर किताबाच्या जवळ :

सप्टेंबर 2022 मध्ये झालेल्या ऑनलाइन ब्रिक्स गेम्सच्या बुद्धिबळ स्पर्धेत साक्षीने भारताला महिला गटात सुवर्णपदक जिंकून दिले. या स्पर्धेत पाच देशाचे पाच प्रतिनिधी सहभागी होते. भारतातर्फे एकमेव साक्षीची निवड करण्यात आली होती. यात बलाढ्य रशिया व चीनच्या खेळाडूंचा समावेश होता.‌‌ ही स्पर्धा राउंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात आली‌ होती. आता साक्षीने वूमन ग्रँडमास्टर टायटलसाठी लागणारे तीनही नॉर्म पूर्ण केले आहे. सर्वांना साक्षी कधी वूमन ग्रँडमास्टर बनेल याची उत्सुकता आहे.

बातम्या आणखी आहेत...