आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:साहेब, काही करा अन पिंपळदरीतील अवैध दारू बंद करा; मयत तरुणाच्या आईचा आर्त टाहो, माजी आमदारही गहिवरले

हिंगोली6 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • हिंगोली

साहेब, दारुच्या नशेतच मुलाने विष पिऊन आत्महत्या केली, माझा मुलगा गेला पण इतरांच्या मुलाचे वाईट होऊ देऊ नका, कुठल्याही परिस्थितीत पिंपळदरीतील अवैध दारु विक्री बंद करा असा आर्त टाहो मयत तरुणाच्या आईने फोडला. गुरुवारी ता. २१ माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांच्याकडे दारुबंदीसाठी कैफीयत मांडली.

औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी हे ४५०० लोकसंख्येचे गाव आहे. गावात तीन ते चार ठिकाणी अवैध देेशीदारुची विक्री होते. अवैध दारु विक्रीमुळे तरुणाई व्यवनाच्या आहारी गेली असून त्यातून घरात वादाचे प्रकारही घडू लागले आहेत. गावातील दारुअड्डे बंद करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली. मात्र त्याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने साफ दुर्लक्ष केले.

दरम्यान, सोमवारी ता. १८ गावातील खुशाल रामराव रिठ्ठे (३७) या तरुणाने दारुच्या नशेत विषारी औषध पिले. त्यांना तातडीने उपचारासाठी हिंगोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतांनाच बुधवारी ता. २० रात्री त्यांचा मृत्यू झाला. आज पिंपळदरी येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत रिठ्ठे यांच्या पश्‍चात आई, वडिल, पत्नी, तीन मुली एक मुलगा असा परिवार आहे.

दरम्यान, माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांनी गावात जाऊन रिठ्ठे कुटुंबियांची भेट घेतली. डॉ. टारफे यांना पाहताच रतनबाई रिठ्ठे यांनी टाहो फोडला. साहेब, गावात होणाऱ्या दारु विक्रीमुळे माझा मुलगा गेला, आमच्या घरावर आभाळच कोसळलेे, इतरांना हे दुःख वाट्याला येऊ नये यासाठी गावातील दारु विक्री बंद करण्यासाठी काही तरी करा अशी विनवणीही त्यांनी केली. त्या आईचे दुःख पाहून माजी आमदार डॉ. टारफे यांनाही गहिवरून आले. याबाबत लवकरच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे मागणी केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...