आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:साहेब, चौदा वर्षापुर्वी वडिलांनी आत्महत्या केली होती, आता अतिवृष्टीमुळे आमच्यावरही हिच पाळी आहे, पिक नुकसानीमुळे कसं जगायचं तुम्हीच सांगा

हिंगोलीएका महिन्यापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

साहेब, चौदा वर्षापुर्वी वडिलांनी आत्महत्या केली होती, आता अतिवृष्टीमुळे आमच्यावरही हिच पाळी आली आहे, पिक नुकसानीमुळे कसं जगायचं तुम्हीच सांगा अशी कैफीयत हिवराजाटू येथील शेतकरी ज्ञानदेव उघडे यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासमोर रविवारी (ता. २७) मांडली.

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भुसे यांनी पाहणी केली. हिवरा जाटू येथील शेतकरी उघडे यांच्या शेतात त्यांनी पाहणी केली. यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, तालुका कृषी अधिकारी भालचंद्र वाघ, शिवसेनेचे पदाधिकारी राजू चापके पाटील, राम कदम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

यावेळी शेतकरी उघडे यांनी कैफियत मांडली. वडिलांनी सन २००६ मध्ये आत्महत्या केली. त्यानंतर शेती व कुटुंबाचा सांभाळ करीत आहे. मात्र यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाला कोंबे फुटली आहेत तर हळदीचे पिक हातचे गेले आहे. त्यासोबतच कापसाची बोंडे देखील सडून गेली. त्यामुळे खरीप हंगामातील एकही पिक हाती येण्याची शक्यता नाही. त्यामुळे वर्षभर संसार कसा सांभाळायचा, प्रत्येक जण येतो, नुकसानीची पाहणी करतो अन निघून जातो मात्र शेतकऱ्यांच्या हाती काहीही पडत नाही. आता तुम्ही तरी शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी अशी विनंतीही त्यांनी कृषिमंत्री भुसे यांच्याकडे केली.

यावेळी भुसे यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी धिर सोडू नये. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. पिक नुकसानीचे पंचनामे केली जातील. तर केंद्र शासनाकडून मदतीसाठी पाठपुरावा केला जाईल. केंद्राचे पथक या भागात पाहणीसाठी यावे यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्‍वासन भुसे यांनी शेतकऱ्यांना दिले.