आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ग्रामीण भागातील नववी ते बारावीच्या शाळा सुरु होवून आता एक महिना उलटला आहे. तरी शिक्षकांमध्ये मात्र शाळा सुरु होण्याचा उत्साह जनू कमीच असल्याचे दिसून आले आहे. याचे कारण म्हणजे कोविड-१९ बाबत खबरदारी म्हणून सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत शाळा भरवण्याचे आदेश असतांना देखील ग्रामीण भागात मात्र काही ठिकाणी गुरुजीच आले नाही तर काही ठिकाणी अद्यापही शाळा बंद असल्याचे प्रकार समोर येत आहेत. एका शाळेवर तर चक्क आळी-पाळीने असा प्रकार सुरु असल्याचे समोर आले. या मनमानी कारभारावर अंकुश लावण्यासाठी आता शिक्षण विभागाच्या वतीने कारणे दाखवा नोटीस शिक्षकांना बजावण्यात आल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी दिली.
देशभरात वाढता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव यामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र २३ नोव्हेंबरपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये. यासाठी कोविड-१९ चे सर्व नियम पाळत ग्रामीण भागातील इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. त्यासाठी सर्व शिक्षकांना आरटीपीसीआर कोरोना चाचणी करुन घेणे अनिवार्य करण्यात आले होते. तर विद्यार्थ्यांना देखील शाळा प्रवेशासाठी पालकांचे संमतीपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र या सर्वांमध्ये ग्रामीण भागातील शिक्षक शाळेत वेळेत येत नाही. तर काही शिक्षक येतच नाहीत अशा तक्रारी असल्याने शिक्षण विभागामार्फत अचानक भेटी देवून तपासणी करण्यात येत आहे. यात वेरुळ येथील केंद्रिय जिल्हा परिषद शाळा बंद असल्याचे आढळून आले. तिथे आठ शिक्षक आहेत. पण एकहीजण हजर नव्हते तर नियमानुसार ५० टक्के स्टाफ असणे आवश्यक आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी सर्व सूचना देवून देखील अचानक भेटीत हे प्रकार समोर येत असल्याने वेरुळसह अन्य काही शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, तुमच्यावर कठोर कारवाई का करण्यात येवू नये असो नोटीसमध्ये बजावण्यात आल्याचे लाटकर यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.