आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:जन्मदात्रीला चौघींनी दिला खांदा, पाचवीने केली अंत्यसंस्कारांची तयारी, सहावीने दिला मुखाग्नी

युवराज सोनवणे | शिरूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सहा बहिणींनी रूढी-परंपरेला दिला फाटा; बीडच्या शिरूर तालुक्यातील घटना

संपूर्ण आयुष्यभर ज्या आईने आपल्याला मायेची ऊब दिली तिचे या जन्मात तरी ऋण फेडणे शक्य नाही. मात्र तिच्या शेवटच्या प्रवासात तिच्या तिरडीला आपला खांदा लागावा अशी इच्छा व्यक्त करत पाच मुलींनी जन्मदात्रीवर अंत्यसंस्कार केले. भाऊ नसल्याने आपल्या आईच्या तिरडीला स्मशानभूमीपर्यंत चार मुलींनी खांदा दिला. पाचवीने नियोजन केले, तर सहाव्या धाकट्या बहिणीने चितेला मुखाग्नी दिला. मुलगाच सर्वस्व आहे, वंशाला दिवा मुलगाच असला पाहिजे असा हट्ट करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही घटना शिरूर तालुक्यातील जांब गावातील आहे.

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरदेखील त्याच्या तिरडीला खांदा आणि चितेला मुखाग्नी मुलेच देतात. परंतु बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील जांब या गावात सहा बहिणींनी ही परंपरा मोडीत काढली. जांब येथील लक्ष्मीबाई रामभाऊ कांबळे (९०) यांचे गुरुवार, २० मे २०२१ रोजी पहाटे ४ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. परंतु लक्ष्मीबाई यांना मुलगा नाही. त्यामुळे त्यांच्या तिरडीला भावकीतील लोकांबरोबर जावई हे खांदा देण्यासाठी पुढे आले. परंतु सहा मुलींनी त्यास नकार दिला. संपूर्ण आयुष्यभर ज्या आईने आपल्याला मायेची ऊब दिली तिचे या जन्मात तरी ऋण फेडणे शक्य नाही. मात्र तिच्या शेवटच्या प्रवासात तिच्या तिरडीला आपलाच खांदा लागावा अशी इच्छा सहा मुलींनी बोलून दाखवली.

अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाइकांनी देखील रूढी-परंपरेला फाटा देत मुलींच्या या निर्णयाला लगेच संमती दर्शवली. या घटनेने समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण झाला आहे.

अंत्यसंस्काराला आलेल्या सर्वांना अश्रू अनावर जांब येथे आईच्या मृत्यूची माहिती मिळताच आलेल्या सुनीता केदार, विमल केदार, शशिकला केदार आणि भीमाबाई मोरे या चार मुलींनी आपल्या आईच्या तिरडीला खांदा दिला. अंत्ययात्रेची सर्व तयारी पाचवी बहीण कचराबाई खंडागळे यांनी केली, तर आईच्या चितेला सहावी धाकटी बहीण शकुंतला पवार हिने मुखाग्नी दिला. हे दृश्य पाहून अंत्यसंस्काराला उपस्थित असणाऱ्या सर्वांना अश्रु अनावर झाले होते.

बातम्या आणखी आहेत...