आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मरणकळा दूर:लाभार्थी रुग्णसंख्येत सहापट, निधीत 12 पटीने वाढ; पात्र आजारांची संख्या 11 वरुन 20 वर

महेश जोशी | छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘मविआ’च्या दोन वर्षांत झाले होते फक्त 4247 रुग्णांवर उपचार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा चढता आलेख पात्र आजारांची संख्या ११ वरून आता २० वर

आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना गंभीर आजारांवर उपचारासाठी आर्थिक मदत करणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला महाविकास आघाडी सरकारच्या काळात आलेली मरणकळा शिंदे सरकारने दूर केली आहे. मविआच्या २ वर्षांत फक्त ४२४७ रुग्णांना लाभ मिळाला, तर शिंदे सरकारच्या ८ महिन्यांत ४८०० रुग्णांना फायदा झाला. जुलैच्या तुलनेत फेब्रुवारीत लाभार्थींत ६ पट तर अर्थसाहाय्यात १२ पट वाढ झाली. योजनेचे मूळ संकल्पक व कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी ही माहिती दिली.

आठ महिन्यांतच मविआला टाकले मागे : मविआ सरकारच्या काळात १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ दरम्यान ४३९५ अर्ज आले. पैकी १७८४ पात्र ठरले. त्यांना ८,३९,८२,८०० रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ दरम्यान ६३१७ अर्जांपैकी २४६३ पात्र ठरले. त्यांना ११,८९,३९,८६० रुपयांची मदत केली. शिंदे सरकारने मात्र ८ महिन्यांतच ४८०० रुग्णांना ३८ कोटी ६० लाख ३३ हजारांची मदत करत मविआला मागे टाकले.

आजारांची संख्या वाढवली
पूर्वी पात्र आजारांची संख्या ११ होती. शिंदे सरकारने ती २० केली. कॉकलियर इम्प्लांट, हृदय, किडनी, बोन मॅरो, यकृत, फुफ्फुस, गुडघा-हाताचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, मेंदूचे आजार, अपघात, नवजात शिशू आजार, बर्न रुग्ण, कर्करोग, लहान बालके, हृदयरोग, डायलिसीस, केमोथेरपी आणि विद्युत अपघात रुग्णांवर आता शस्त्रक्रिया केली जाते.

फडणवीस सरकारने केली होती स्थापना
देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये गरीब रुग्णांना मोफत उपचारांचा लाभ मिळावा म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन केला. परंतु नोव्हेंबर २०१९ मध्ये सत्तांतर होऊन मविआ सरकार आले. मार्चपासून कोरोना संकट अाले अन् कामकाज रेंगाळले. जुलै २०२२ मध्ये शिंदे-फडणवीस सरकारने हा कक्ष पुन्हा सुरू केला. सचिवालयातील विशेष कार्य अधिकारी आणि योजनेचे मूळ संकल्पक मंगेश चिवटे यांची कक्षप्रमुख पदावर नियुक्ती केली.

आठ महिन्यांत ३८.६० कोटींची मदत : आठ महिन्यांत ४८०० रुग्णांना ३८.६० कोटींची मदत मिळाली. ८ महिन्यांत रुग्णांमध्ये ५३७ टक्के (६ पट) तर अर्थसाहाय्यामध्ये ११२९% (१२ पट) वाढ झाली.

दरमहा वाढत गेले लाभार्थी : पहिल्या महिन्यात जुलैमध्ये १९४ रुग्णांना ८३.५७ लाखांचे वैद्यकीय साहाय्य देण्यात आले. याच वर्षी फेब्रुवारीअखेरीस १२३७ रुग्णांना विक्रमी १०.२७ कोटींचे अर्थसाहाय्य.

एकही रुग्ण उपचाराविना राहू नये
एकही गरीब रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. आम्ही त्याचे पालन करत आहाेत.
- मंगेश चिवटे, कक्षप्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता.

एकही रुग्ण उपचाराविना राहू नये
एकही गरीब रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. आम्ही त्याचे पालन करत आहाेत.
- मंगेश चिवटे, कक्षप्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता.

बातम्या आणखी आहेत...