आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक टी-२० क्रिकेट स्पर्धेत स्कोडा व पीडब्ल्यूडी संघाने विजय मिळवला. रविवारी झालेल्या लढतीत स्कोडाने एनएचके संघावर ७ गडी राखून मात केली. या लढतीत संदीप तुपे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत एनएचकेने २० षटकांत ६ बाद ११९ धावा उभारल्या. सलामीवीर खालेद कादरीने ४१ चेंडूंत ७ चौकारांसह ४३ धावा काढल्या. कर्णधार राहुल यादव अवघ्या ४ धावांवर बाद झाला. पाचव्या क्रमांकावर आलेल्या अनुभव पंकज फलकेने २० चेंडूंत १ चौकार व २ षटकार खेचत ३० धावा केल्या. कैलास हजारेच्या १४ धावा वगळता इतर फलंाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. प्रवीण खराटे ९ धावांवर नाबाद राहिला. स्कोडाकडून संदीप तुपेने १६ धावा देत ३ गडी बाद केले. स्वागतने २ आणि शेख निजाम, अंबादास हाकेने प्रत्येकी एक बळी घेतला.
प्रत्युत्तरात, स्कोडा संघाने १६.२ षटकांत ३ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. सलामीवीर संदीप खोसरेने १४ धावा केल्या. कर्णधार विपुल बोंडेने ४३ चेंडूंत ५ चौकारांसह ४४ धावांची खेळी केली. पवन कावळेने ३० चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ३५ धावांचे योगदान दिले. प्रवीण नागरे १५ धावांवर नाबाद राहिला. एनएचकेकडून संग्राम परिहार, खालेद कादरी, पंकज फलके यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
अमित पाठकचे अर्धशतक दुसऱ्या लढतीत पीडब्ल्यूडी संघाने जीएसटी संघावर ११ धावांनी विजय मिळवला. प्रथम खेळताना पीब्ल्यूडीने २० षटकांत ९ बाद १४६ धावा उभारल्या. यात अमित पाठकने ३८ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकाराच्या मदतीने ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली. विवेक घुगेने २३, कर्णधार रवींद्र तोंडेने १० आणि राजेश ढोरमारेने ३४ धावा जोडल्या. जीएसटीकडून अनिल थोरेने ३, ऋषिकेशने २ व गणेश सरोदेने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात जीएसटी संघाचा डाव १९.२ षटकांत १३५ धावांवर संपुष्टात आला. अनिल थोरेने सर्वाधिक ३९ धावा काढल्या. सागर जावळे, शैलेश सूर्यवंशी, अमित पाठकने दोन गडी बाद केले. अष्टपैलू अमित पाठक सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.