आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्प:विमानतळाची गगनभरारी, निओ मेट्रो कागदावरच

छत्रपती संभाजीनगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अर्थसंकल्प सादर केला. यात मागील २० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चिकलठाणा विमानतळाच्या भूसंपादनासाठी ७३४ कोटी रुपये देण्याची घोषणा केली. मात्र, शहराच्या भविष्यासाठी आवश्यक असणारा शेंद्रा-वाळूज हा २४ किलोमीटरचा अखंड उड्डाणपूल, निओ मेट्रोचा साधा उल्लेखही केला नाही.

सत्ताधाऱ्यांच्या मते हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. शेतकरी, महिलांसाठी कल्याणकारी निर्णय घेण्यात आले, तर तरुणांसाठी रोजगार, कौशल्यविकास अशा अनेक बाबींचा विचार यात करण्यात आला. विरोधकांच्या मते, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आश्वासनांचा पाऊस पाडलेले हे बजेट आहे. शहर व जिल्ह्यासाठी ८९४ कोटी देण्याची घोषणा करण्यात आली. यातून विमानतळासह इतर विकासकामांचा प्रश्न मार्गी लागेल. नाशिकसह इतर काही शहरांचा नियो मेट्रोचा प्रस्ताव केेंद्राकडे पाठवण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगरला अर्थसंकल्पात आठवे स्थान
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील थेट निधीवाटपात राजधानी असलेल्या मुंबईला सर्वाधिक, त्याखालोखाल रायगड व नागपूरला सर्वाधिक झुकते माप देण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरला देण्यात आलेल्या थेट निधीचा क्रमांक आठवा लागतो आहे.

काय आहे निओ मेट्रो, उड्डाणपुलाचा प्रकल्पॽ
नियाे मेट्रो आणि शेंद्रा ते वाळूज एमआयडीसीपर्यंतच्या उड्डाणपुलासाठी आठ हजार २३७ कोटींचा डीपीआर तयार करण्यात आला हाेता. या वर्षअखेरीस या दोन्हीही प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डाॅ. कराड यांनी सांगितले. मागच्याच आठवड्यात याचा अंतिम डीपीआर सादर करण्यात आला. निओ मेट्रोसाठी ४५०० कोटी तर शेंद्रा एमआयडीसी ते वाळूज पुलासाठी ३७३७ कोटी खर्च येणार आहे.

ही अपेक्षा फोल
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या पुढाकाराने २४ किलोमीटरचा उड्डाणपूल आणि निओ मेट्रोचा आठ हजार कोटींचा डीपीआर तयार करण्यात आला हाेता. त्यासाठी निधी दिला नाही. याशिवाय पर्यटन, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, उद्योगातील वीज बिलात सवलतीची घाेषणा हाेईल, अशी अपेक्षा हाेती. ती फाेल ठरली.

उद्योग विकास व रोजगारनिर्मिती यावर भर देणारा अर्थसंकल्प
पायाभूत सुविधा, उद्योग विकास व रोजगारनिर्मिती यावर भर देणारा हा अर्थसंकल्प आहे. एका अर्थाने हे राज्याच्या विकासासाठी अमृतच आहे. आर्थिक, दुर्बल घटकांचा प्राधान्याने विचार करून सामाजिक व प्रादेशिक समतोल साधला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या अनेक योजना आहेत. रस्ते, लोहमार्ग, बंदरे व विमानतळ विकासास अग्रक्रम दिला आहे.- राम भोगले, उद्योजक

शहराच्या पर्यटन विकासासाठी विमानांची कनेक्टिव्हिटी वाढवा
पर्यटन विकासासाठी विमानांची कनेक्टिव्हिटी वाढवणे आवश्यक आहे. मात्र, तशी तरतूद दिसत नाही. शहरासह जिल्ह्यातील रस्ते चांगले हवेत. आता विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी निधीची तरतूद केली. चिकलठाणा विमानतळावर इंधन भरणे, पार्किंगची सुविधा लागू केली तर विमानांची संख्या वाढेल. शिवाय चांगला महसूल मिळेल. - अहमद जलील, दळणवळणाचे अभ्यासक

शेंद्रा-वाळूज उड्डाणपूल, निअो मेट्रोचा उल्लेख हवा होता
शेंद्रा ते वाळूज उड्डाणपूल, निअो मेट्राेचा अर्थसंकल्पात उल्लेख नाही. सफारी पार्कलाही ठाेस निधी दिला नाही. विमानतळाच्या भूसंपादनासाठी निधी जाहीर केला. मात्र, विमानतळ विकासासाठी काय नियोजन केले हे स्पष्ट हाेत नाही. पायाभूत सुविधांसाठी जी तरतूद करण्यात आली आहे त्याचा छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याला चांगला फायदा होईल. - एम. डी. सोनवणे, निवृत्त शहर अभियंता

विदर्भाला झुकते माप असले तरी मराठवाड्याकडे दुर्लक्ष नाही
प्रत्येक जिल्ह्यात ५०० युवकांना पर्यटन प्रशिक्षण देण्याचे व १० पर्यटनस्थळांवर टेंट सिटी उभारण्याचे यात नमूद आहे. यात छत्रपती संभाजीनगर असावे. पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास शहराच्या पर्यटन विकासास चालना देणारे ठरेल. क्रीडा विद्यापीठाची तरतूद ही महत्त्वाची उपलब्धी आहे. विदर्भाला झुकते माप असले तरी मराठवाड्याकडे दुर्लक्ष नाही. - डॉ. धनश्री महाजन, अर्थतज्ज्ञ

शिक्षक आणि प्राध्यापकांची भरती पूर्ण करण्यावर मौन का?
शिक्षण सेवकांच्या मानधनात झालेली वाढ, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीतील वाढ स्वागतार्ह आहे. पीएमश्रीअंतर्गत पाच वर्षांसाठी ८१६ शाळांसाठी १५३४ कोटींची तरतूद महत्त्वाची आहे. मात्र, याची अंमलबजावणी कशी होते त्यावर त्याची फलनिष्पत्ती अवलंबून आहे. आता शिक्षक आणि प्राध्यापकांची भरती पूर्ण केली तरच या तरतुदी अर्थपूर्ण ठरू शकतात. - डॉ. पुरुषोत्तम देशमुख, अर्थशास्त्र विभागप्रमुख

बातम्या आणखी आहेत...