आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीच्या 44 रस्त्यांच्या कामांना मुहुर्त:जानेवारी अखेरीस सुरू होणार, रोड डिझाईनला आयआयटी मुंबईची मान्यता घेणार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यातील २२ रस्त्यांची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळें दुसर्‍या टप्प्यातील ४४ रस्त्यांच्या यादीला स्मार्ट सिटीचे सिईओ डॉ. अभिजित चौधरी यांनी मंजूरी दिली असून आयआयटी मुंबई संस्थेची रस्त्याच्या संकल्पचित्रास मान्यता घेऊन या महिना अखेरीस कामाला सुरूवात केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

स्मार्ट सिटीच्या ३१७ कोटीच्या निधीतून शहरातील १०९ रस्त्यांची कामे हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन रस्त्यांची यादी तयार करण्यात आली. स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत रस्ते कामाला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून ए. जी. कंन्स्ट्रक्शन एजन्सीची नियुक्ती करण्यात आली. स्मार्ट सिटीने निधीच्या उपलब्धतेनुसार रस्त्यांची कामे हाती घेतली जातील असे आदेश कंत्राटदार एजन्सीला देण्यात आले.

स्मार्ट सिटीकडे ८० कोटीचा निधी उपलब्ध असल्यामुळे त्यातून पहिल्या टप्प्यात २२ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली. स्मार्ट सिटीने रस्त्यांच्या कामाचे त्रयस्थ संस्थेमार्फत लेखा परिक्षण करण्यासाठी आयआयटी मुंबई या संस्थेची नियुक्ती केली. आयआयटी मुंबईच्या पथकाने रस्त्याची पाहणी करून डिझाईन मंजूर केले. त्यानंतर प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरूवात झाल्यानंतर आयआयटीच्या पथकाने रस्ता कामाची पाहणी करून कंत्राटदार एजन्सीला साहित्य वापरण्याबद्दल योग्य त्या सूचना केल्या. रस्त्याच्या कामाबद्दलचा अहवाल सादर करून आरआरसी नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला.

दरम्यान, स्मार्ट सिटीचे सिईओ डॉ. अभिजित चौधरी यांनी पदभार स्विकारल्यानंतर स्मार्ट सिटीच्या कामांचा आढावा घेतला. प्राधान्यक्रमानुसार कामे करण्याचे नियोजन करून ज्या कामांचे कार्यारंभ आदेश दिलेले नाहीत अशी कामे रद्द केली. त्यामुळे निधीची बचत झाली. त्यासोबतच स्मार्ट सिटीबससाठी डिपॉझिट केलेल्या दोनशे कोटी रुपयांची एफडी तोडून त्यातील शंभर कोटी रस्त्यांच्या कामासाठी वापरण्यास हिरवा कंदील दिला.

पहिल्या टप्प्यातील २२ रस्त्यांची कामे पूर्ण होत असताना दुसर्‍या टप्प्यात केल्या जाणार्‍या ४४ रस्त्याच्या यादीला मंजूरी देण्यात आली आहे. या ४४ रस्त्यांचे डिझाईन तयार करून आयआयटी मुंबईला पाठवून त्यांची मान्यता घेतली जाणार आहे. त्यानंतर रस्ते कामाला या महिना अखेरीस सुरूवात करण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...