आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:बंदुकीचा धाक दाखवून तिघांनी व्यापाऱ्याचे 14 लाख पळवले;हिंगोली गेट परिरातील घटना

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लोहा तालुक्यातही 8 लाख हिसकावले

लाॅकडाऊनची स्थिती असताना मराठवाड्यात ठिकठिकाणी लुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जालना शहरात व्यापाऱ्याला लुटल्याची घटना ताजी असतानाच नांदेडच्या हिंगोली गेट उड्डाणपुलावरील वर्दळीच्या रस्त्यावर सोमवारी (ता.१०) सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास दुचाकीवरील तिघांनी बंदुकीचा धाक दाखवून एका व्यापाऱ्याकडील १४ लाख ८४ हजार रुपयांची रक्कम ठेवलेली बॅग लंपास केली, तर लोहा तालुक्यात पेट्रोल पंप मॅनेजरच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून ८ लाखांना लुटण्यात आले.

नवा मोंढा येथील हिंदुस्तान युनिलिव्हर एजन्सीचे मालक व्यापारी ओम बोरलेपवार हे बॅगमध्ये १४ लाख ८४ हजार रुपयांची रक्कम घेऊन सोमवारी पावणेबाराच्या सुमारास बँकेत भरण्यासाठी चिखलवाडी कॉर्नरकडे जात होते. त्यांची दुचाकी हिंगोली गेट उड्डाणपुलावर आली असता दुचाकीवरील तिघांनी व्यापारी बोरलेपवार यांना समोरून अडवले. या वेळी त्यांना काही न बोलता त्यांना पिस्तूल व अन्य धारदार शस्त्रांचा धाक दाखवून पाठीला लावलेली पैशाची बॅग हिसकावली. या वेळी व्यापारी बोरलेपवार यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यात त्यांच्या बॅगचा बंद तुटला व बॅग तिघांकडे गेली. बॅग हाती लागताच तिघेही पसार झाले. भरदुपारी व्यापाऱ्यास लुटल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख, वजिराबाद ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, पांडुरंग भारती घटनास्थळी दाखल झाले. या वेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

लोहा तालुक्यात डोळ्यात मिरची पूड टाकून लुटले

नांदेड-सोनखेडदरम्यान लोहा तालुक्यातील जानापुरी येथील पेट्रोल पंपावरील मॅनेजर नवनाथ केंद्रे व इतर एक जण सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास पेट्रोल पंपावर जमलेले ८ लाख रुपये घेऊन बँकेत भरण्यासाठी जात होते. याचदरम्यान ३ जण दुचाकीवर आले व त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पैशाची बॅग ओढून घेण्याचा प्रयत्न केला. नागनाथ केंद्रे यांनी त्यास विरोध केला तेव्हा दरोडेखोरांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात ते जखमी झाले आहेत. दरोडेखोरांनी ८ लाखांची बॅग घेऊन पळ काढला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. हिंगोली गेट उड्डाणपुलावरील घटनास्थळाची पाहणी करताना पोलिस कर्मचारी.

चोरट्यांच्या शोधासाठी पथके केली रवाना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॉमेऱ्यातील फुटेजची तपासणी केली असता यात मोटारसायकलवर तोंडाला रुमाल बांधलेल्या अवस्थेत तिघे आढळून आले. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेसह वेगवेगळी पथके रवाना झाली आहेत, असे वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...