आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोबाइल अॅप्लिकेशनवरून घेतलेले अत्यल्प कर्ज वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या एका तरुणाला मन:स्ताप देणारे ठरले. आठ दिवसांच्या मुदतीवर रुपी प्रो कंपनीकडून घेतलेल्या ५ हजार रुपयांपेक्षा कमी रकमेच्या कर्जासाठी त्यास १५०० रुपये व्याज भरावे लागले. शिवाय मुदत संपण्याआधीच कंपनीने वसुलीचा ससेमिरा लावत त्यांची सोशल मीडियावर बदनामी केली. याबाबत त्याने जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
प्रवीण सरदेशपांडे यांनी मेडिकल इमर्जन्सीसाठी ८ मार्च रोजी रुपी-प्रो मोबाइल अॅप्लिकेशनवर ३७९६ रुपयांचे कर्ज घेतले. यातून व्याज व प्रोसेसिंग शुल्काचे १४९६ रुपये कापून २५०० रुपये हातात आले. १५ मार्च रोजी त्यांना ही रक्कम अदा करायची होती. मात्र, १४ मार्चपासूनच त्यांच्या मोबाइलमधील काँटॅक्ट लिस्टमधील लोकांना प्रवीण यांच्यासंबंधी ५ प्रकारचे आक्षेपार्ह मेसेज व व्हॉट्सअॅप पोस्ट येण्यास सुरुवात झाली. त्यांना आलेल्या नंबरवर कॉल लागत नव्हते. एक नंबर पश्चिम बंगालमध्ये एका ९० वर्षांच्या महिलेला लागला. कर्जाची रक्कम भरल्यानंतर हे प्रकार थांबले.
पोलिसांत तक्रार दाखल, गुन्ह्याची प्रतीक्षा
पोलिस ठाण्यात तक्रार
प्रवीण यांचे नातेवाईक, मित्रपरिवार व कंपनीतील कर्मचाऱ्यांना हे मेसेज गेले. या प्रकाराने प्रवीण यांना प्रचंड मानसिक ताण झाला. अनेकांनी फोन करून खातरजमा करून घेतली. या प्रकाराला वैतागून त्यांनी १५ मार्च रोजी जवाहरनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मंगळवारपासून रुपी प्रो हा अॅप गुगल प्ले स्टोअरवरून गायब झाला आहे.
झटपट मिळते कर्ज
आधार, पॅन कार्ड आणि लाइव्ह सेल्फी अपलोड केल्याच्या १५ मिनिटांत ७ दिवसांच्या मुदतीचे २ हजार रुपयांपासून कर्ज मिळण्यास सुरुवात होते. सी बिलची गरज नसल्याने तरुणाई या कर्जाच्या विळख्यात सापडली आहे. गुगल प्ले स्टोअरवर अशा प्रकारचे ५ हजारांहून अधिक अॅप आहेत. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद येथून ते चालवले जातात.
महिन्याला ६० टक्के व्याज : ५००० रुपयांसाठी १५०० कापून ३५०० रुपये हातात पडतात. सात दिवसांत संपूर्ण ५००० भरावे लागतात. म्हणजेच ५ हजारांवर ३ हजार व्याज जाते. महिन्याला ६० टक्के व्याज लागते. बँका वर्षाकाठी १३ ते १४ टक्के व्याजावर पर्सनल लोन देतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.