आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली चिंता:सामाजिक स्थैर्य बिघडतेय, ते टिकवणे नितांत आवश्यक, हेच आपल्यासमोर आव्हान

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या परस्परांवरील आरोप-प्रत्यारोप पाहून चांगलेच मनोरंजन होत आहे. मात्र, समाजव्यवस्थेत सुधारणा व्हावी, याबद्दल कोणीच काही बोलत नसल्याची खंत आहे. अशा स्थितीत सामाजिक स्थैर्य बिघडत आहे. सामाजिक स्थैर्य टिकवणे नितांत आवश्यक आहे, किंबहुना तेच सध्या आपल्यासमोरील आव्हान आहे. असे मत राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

रविवारी (ता. 5) त्यांच्या हस्ते प्रा. डॉ. वाल्मीक सरवदे लिखित 'भूक' या आत्मकथनाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, पँथरचे नेते ज. वि. पवार, लेखक डॉ. सरवदे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.

सुसंस्कृत होण्याची गरज

ॲड. निकम म्हणाले, सुसंस्कृत होण्यासाठी चांगले विचार आणि माध्यमाची गरज असते. माणसाला घडविण्याचे काम परिस्थिती नव्हे तर मनस्थिती ठरवते. शिक्षणामुळे लोक सुशिक्षित झाले तरी सुसंस्कृत होण्याची गरज आहे.

निकमांनी दुष्टांचा संहार केला- डॉ. कसबे

डॉ. कसबे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देशात आज अराजक निर्माण झाले आहे. अल्पसंख्याक, आदिवासी, दलित भयभीत आहेत. आपण कठीण काळातून जात आहोत. सत्तसधीशांनी टोळ्या निर्माण केल्या आहेत आणि सर्वसामान्य श्रमिक घाबरलेले आहेत. धर्माला ग्लानी येईल आणि दुष्टांची संख्या वाढेल तेव्हा सज्जनांचे रक्षण करण्यासाठी मी येईल, असे भगवंतांनी गीतेत म्हटले आहे. पण, आपले भगवंत खोटे निघाले आणि त्यांनी दुष्टांचा संहार केला नाही. उज्ज्वल निकम यांच्यासारख्या वकिलाने भगवंत होऊन दुष्टांचा संहार केला हे त्यांच्या कामगिरीवरून लक्षात येते. असेही कसबे म्हणाले.

आत्मचरित्र दलित साहित्याची ओळख- ज. वि. पवार

दलित साहित्यात कविता आणि आत्मचरित्र प्रकाराने चळवळ सुरू झाली. या साहित्याला नाकारण्याचे प्रयत्न झाले. पण, हा प्रकार रूढ होऊन दलित साहित्याची ओळख झाली. काही लेखकांनी सहानुभूती मिळविताना खोटे लेखन केले. त्यातून समाजाचे उन्नयन झाले नाही. ज्यांच्याकडे सांगण्यासारखे आहे ते लोक आता लिहू लागल्याने समाधान वाटते, असे ज. वि. पवार म्हणाले. डॉ. मनोहर शिरसाट यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. चैताली सरवदे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...