आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गौताळ्याच्या ‘इको सेन्सिटिव्ह झोन’मध्ये 1150 एकरवर उभारले सौरऊर्जा प्रकल्प

औरंगाबाद16 दिवसांपूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
  • फर्मी साेलार फार्म्स, जेबीएम कंपन्यांचे प्रकल्प, वन आणि महसूल खात्याची मात्र डोळेझाक

गाैताळा औट्रम वन्यजीव अभयारण्याच्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये (ईएसझेड) तब्बल ११५० एकर जागेवर दोन सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यास पर्यावरणप्रेमींसह ग्रामस्थांकडून प्रचंड विरोध होत आहे. मात्र, वन आणि महसूल खाते कंपनीच्या पाठीशी उभे राहिल्याने प्रकल्प पूर्ण झाले. औरंगाबाद-चाळीसगाव मार्गावरील औट्रम घाटाखाली नजर जाईल तिथपर्यंत चकाकणाऱ्या सोलार पॅनलने शेकडो शेतकऱ्यांची स्वप्ने अंधकारमय केली आहेत. प्रकल्पासाठी शेतजमिनींवर बुलडोझर चालवण्यात आले. विशेष म्हणजे हे सगळे झाले ते गौताळा अभयारण्याच्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये. आवाडा समूहाच्या फर्मी साेलार फार्म्स आणि जेबीएम साेलार पाॅवरने २०१८ मध्ये हे सौरऊर्जा प्रकल्प उभारले. प्रकल्पाच्या ठिकाणी आवाडा एनर्जी प्रा. लिमिटेड (पूर्वीचे गिरिराज रिन्युएबल्स प्रा.लि.) एवढाच उल्लेख आहे.

समृद्ध वन्यजीव, वनसंपदा : गौताळा अभयारण्यात बिबट्या, लांडगा, अस्वल, हरिण यासारखे ३० हून अधिक प्राणी प्रजाती, २० स्थलांतरित पक्ष्यांसह २१० प्रकारचे पक्षी, सरपटणारे प्राणी आणि माशांचा अधिवास आहे. या ठिकाणी सातत्याने होणारा मनुष्य-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी अभयारण्याच्या चारही बाजूचा परिसर इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर करण्यात आला.

वनाधिकाऱ्यांचे मौन : राज्य आणि केंद्राच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाला प्रकल्पाच्या परवानगीविषयक माहिती अधिकारातून माहिती मागितली. राज्याने माहिती दिली नाही. तर केंद्राने अशा परवानग्यांविषयी माहिती नसल्याचे उत्तर दिले. प्रभारी मुख्य वनसंरक्षक शिवाजीराव फुले आणि उपवनसंरक्षक एस.व्ही. मानकवार यांची तीन वेळेस भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण भेट झाली नाही. फुलेे यांनी मेसेजला उत्तर देणे टाळले. मानकवार यांनी तीन वेळेस पीए कडून विषयाची माहिती घेतली. परंतु कोरोनाचे कारण देत भेटण्यास नकार दिला. माहितीही दिली नाही. यामुळे वन खात्याची नेमकी भूमिका समजू शकलेली नाही.

प्रकल्पाला विरोध
आम्ही कृती समितीच्या माध्यमातून सुरुवातीपासून प्रकल्पाला विरोध करत आहोत. आमच्यावर गुन्हे दाखल झाले.धनदांडग्याच्या प्रकल्पासाठी नियम मोडण्यात आले आहेत. प्रकल्पामुळे फायदा तर नाहीच, नुकसानच होते आहे. - भीमराव जाधव, सचिव, शेतकरी बचाव कृती समिती, चाळीसगाव

विकास हवा, विध्वंस नको
आम्ही विकासाला विरोध करत नाही, परंतु अशा प्रकल्पांसाठी निसर्गाशी खेळ अमान्य आहे. पशू-पक्षी अभयारण्याच्या सीमा ओलांडतात. यातून होणारा मनुष्य-प्राणी संघर्ष टाळण्यासाठी इको सेन्सिटिव्ह झोनची निर्मिती केली जाते. परंतू येथे नियम मोडल्याचे जाणवते. -डॉ.किशाेर पाठक, मानद वन्यजीवरक्षक

१२५० कोटी गुुंतवणूक : महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) म्हणजेच मेडाने जारी केलेल्या यादीनुसार आवाडा समूहाच्या बोधरे येथील जेबीएम साेलार पाॅवरची १०० मेगावॅट तर शिवपूरच्या फर्मी साेलार फार्म्सची ८० मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता आहे. हे प्रकल्प एप्रिल २०१८ मध्ये कार्यान्वित झाले. प्रकल्पात १२०० काेटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. फर्मी साेलारने ३.५ लाख तर जेबीएमने ४.५ लाख असे ७.५ लाख सोलार पॅनल जमिनीपासून ५ फूट उंचीवर बसवले आहेत.

ग्रामसभेची किंमत शून्य
शिवापूरला शिवापूर-पाटणा-चंडिकावाडी-गुजरदरी अशी ग्रुप ग्रामपंचायत असून चार गावांची मिळून सुमारे ४८०० लोकसंख्या आहे. ग्रामपंचायतीच्या १३ पैकी अवघ्या ५ सदस्यांनी प्रकल्पाच्या बाजूने कौल दिला होता. बोधरेची लोकसंख्या ३२०० आहे. येथील ९ पैकी ३ सदस्य प्रकल्पाला मंजुरी देण्याच्या बाजूने होते. गावातील काही तरुणांनी ग्रामसभेचा ठराव तहसील कार्यालयाला दिला. मात्र, प्रकल्पासाठी ग्रामसभेची मंजुरी किंवा नाहरकत प्रमाणपत्राची गरज नसल्याचे सांगत महसूलने तो स्वीकारण्यास नकार दिला आणि प्रकल्प उभा राहिल्याचे प्रकल्पग्रस्तांना न्याय मागण्यासाठी स्थापन झालेल्या शेतकरी बचाव कृती समितीचे सचिव भीमराव जाधव म्हणाले.

इकाे सेन्सिटिव्ह बोधरे, शिवापूरमध्ये प्रकल्प
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने ९ डिसेंबर २०१६ रोजी मंत्रालयाने ईएसझेडची अंतिम अधिसूचना जारी करत त्याचा आराखडा, व्याप्ती जाहीर केली. अभयारण्याच्या चारही दिशेने एक किलोमीटरच्या परिसरात झोन असून एकूण ४४८.४५ चौरस किलोमीटर क्षेत्र यात समाविष्ट झाले आहे. कन्नड तालुक्यातील ४९ गावे तर चाळीसगाव तालुक्यातील २१ गावांचा यात समावेश आहे. यापैकी दोन गावांत सोलार प्रकल्प उभारण्यास सुरुवात झाली. ईएसझेड गावांच्या यादीतील ६१ आणि ६२ क्रमांकावर चाळीसगाव तालुक्यातील बोधरे आणि शिवापूरचा उल्लेख आहे. या गावातच सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. दोन्ही गावांतील २४७ शेतकऱ्यांच्या ११५० एकर जमिनीवर प्रकल्प उभा राहिला आहे.

कंपनीची माहिती देण्यास टाळाटाळ : दिव्य मराठी प्रतिनिधीने सौरऊर्जा प्रकल्पावरील आक्षेपांबाबत कंपनीचे मत जाणून घेण्यासाठी फर्मी सोलार आणि जेबीएम सोलारला ई-मेल केला. मात्र, कंपनीकडून उत्तर आले नाही.प्रकल्पाला भेट दिली. यावेळी फर्मी सोलारचे एचआर प्रमुख मनोज खेळकर यांनी बोलण्यास नकार दिला. त्यांनी प्रकल्प प्रमुख सौरभ त्यागी यांची भेट घेण्याची गरज नसल्याचे सांगितले. जेबीएमचे प्रकल्पप्रमुख मनीष सिंग प्लँटवर हजर असताना त्यांनी सिक्युरिटी हेड आशिष सिंग यांना बोलण्यासाठी गेटवर पाठवले. आमच्या मुख्यालयातून उत्तर येईल, असे सांगत बोलणे टाळले.

बातम्या आणखी आहेत...