आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील वर्षीच्या सोहळ्यासाठी तयारी सुरू:जी-20 देशांच्या परिषदेचे काही कार्यक्रम, बैठका औरंगाबादेत

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • { पुढील वर्षीच्या सोहळ्यासाठी नियोजनाची तयारी सुरू { २० देशांच्या राष्ट्राध्यक्षांसह पंतप्रधान, सचिव भारतात येणार

जगातील महत्त्वाच्या २० देशांचा समावेश असलेल्या जी - २० संघटनेची शिखर परिषद २०२३ मध्ये भारतात होणार आहे. त्यासाठी या देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्यासह शेकडो सचिव, अधिकारी भारतामध्ये येणार आहेत. या परिषदेतील काही कार्यक्रम, बैठका मुंबई-पुण्याशिवाय औरंगाबादेतही होणार असल्याचे मंगळवारी (३० ऑगस्ट) स्पष्ट झाले. त्या सोहळ्याच्या नियोजनाची तयारी सुरू झाली आहे. औरंगाबादमध्ये सौंदर्यीकरण, विकास कामांची जबाबदारी मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. पुणे, औरंगाबाद विभागीय आयुक्तांची एक समन्वय समितीही स्थापन करण्यात आली आहे.

परिषदेसाठी देशातील कोणत्या शहरांची निवड करावी, हे ठरवण्यासाठी काही महिन्यांपूर्वी केंद्रीय पथक आले होते. परिषदेचे सचिव एल. के. बाबू यांनी वेरूळ, अजिंठ्याची पाहणी केली होती. त्यांच्यासमोर उद्योजक, अधिकाऱ्यांनी औरंगाबादची शक्तिस्थळे, वैशिष्ट्ये मांडली. ती मान्य होऊन औरंगाबादचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली. त्यात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी निवास व्यवस्था कशी करता येईल, कोणती पर्यटन आणि ऐतिहासिक स्थळे परदेशी पाहुण्यांना दाखवता येतील, याची माहिती दिली. पाहुण्यांना उत्तम दर्जाच्या सुविधा द्या. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, पर्यटनस्थळांच्या माहितीचे चांगले सादरीकरण करावे. औद्योगिक गुंतवणुकीसाठी येणाऱ्या संधीचे सोने करावे. त्यासाठी उद्योग, सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाने साहित्य निर्मिती करावी. पाहुणे जेथे जातील तेथील स्थळांचा विकास, सौंदर्यीकरण आणि संवर्धनासाठी आतापासूनच नियोजन करावे, अशा सूचना श्रीवास्तव यांनी दिल्या. बैठकीस गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, उच्च आणि तंत्रशिक्षण सचिव विकासचंद्र रस्तोगी, आदिवासी विकास विभाग सचिव अनुपकुमार यादव, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.

हे देश होणार सहभागी भारतात पहिल्यांदाच जी-२० परिषद होत असून त्यात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, जर्मनी, जपान, फ्रान्स, भारत, इंडोनेशिया इटली, रशिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्कस्तान आणि युनायटेड किंगडमचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...