आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:पांगरा शिंदे येथील शेतकऱ्याच्या मुलाने मिळवले केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश, देशात ५७४ वा क्रमांक

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा सुरेश कैलासराव शिंदे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यश मिळविले आहे. मुलाच्या निकालानंतर आई-वडिलांना मात्र काय प्रतिक्रिया द्यावी हे कळालेच नाही पण मुलगा अधिकारी झाला एवढेच ते सांगू शकले.

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील सुरेश कैलासराव शिंदे यांचे शिक्षण पांगरा शिंदे येथील प्राथमिक शाळेत झाले. इयत्ता सातवी पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण झाल्यानंतर आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण रोकडेश्वर विद्यालय पांगरा शिंदे येथे झाले. त्यानंतर त्यांनी नांदेडच्या यशवंत महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले. त्यादृष्टीने त्यांनी तयारीही सुरू केली. सन २०१२ मध्ये बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी नांदेडच्या श्री गुरू गोविंदसिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. सन २०१५ साली त्यांनी या अभ्यासक्रमात ८२ टक्के गुण मिळविले.

त्यानंतर त्यांना आयटी सेक्टर मध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीची ऑफर देखील आली. मात्र अधिकारी होण्यासाठी त्यांनी मोठ्या पगाराची नोकरी धुडकावली. २०१६ मध्ये त्यांनी दिल्ली येथे जाऊन लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. मुलगा अधिकारी होणार या आशेवर मागील १८वर्षांपासून शेतात राहणाऱ्या त्यांच्या आईवडिलांनी सुरेश शिंदे यांना प्रोत्साहन दिले.

आई-वडिलांचे कष्टाचे चीज व्हावे यासाठी त्यांनी दिवस रात्र करू अभ्यास केला. सन २०१७ मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. मात्र मुख्य परीक्षेत त्यांना अपयश आले. त्यानंतर 2018 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात मुलाखतीपर्यंत पोहोचले. मात्र अंतिम यादीमध्ये त्यांना यश मिळाले नाही.

मात्र अपयश ही यशाची पहिली लक्षात घेऊन त्यांनी नव्या जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. त्यानंतर या तिसऱ्या प्रयत्नात यश त्यांच्या पदरी पडले. आज निकाल जाहीर होताच त्यांनी गावी शेतात राहणाऱ्या आई-वडिलांना परीक्षा पास झाल्याची माहिती दिली. मात्र लोकसेवा आयोगाची परीक्षा काय आहे याची माहिती त्यांच्या आई-वडिलांना नाही. मात्र मुलगा मोठा अधिकारी झाला आहे हे कळलेल्या आई-वडिलांच्या डोळ्यातुन मात्र आनंदाच्या धारा वाहू लागल्या.

सुरेश शिंदे यांनी देशात ५७४ वा क्रमांक मिळवला आहे. ग्रामीण भागात शिक्षण घेतल्यानंतरही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिले. विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येय ठरवून त्यानुसार अभ्यास सुरू केल्यास यश निश्चितच मिळते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.