आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेतील आणखी एक धक्कादायक गैरप्रकार ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणला आहे. शहरापासून १८ किमी दूर शेंद्रा गावात वाल्मीकराव दळवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र चक्क शेजारचे ए. के. फोटो स्टुडिओ आणि झेरॉक्स दुकानदारांकडून ‘ऑपरेट’ केले जाते आहे. या सेंटरवर सकाळी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सायंकाळी ४ ते ६ च्या वेळेत पुन्हा उत्तरपत्रिका लिहिण्यास दिल्या जातात. हे दुकानदार फक्त ३०० ते ५०० रुपये घेऊन संस्थाचालकाच्या मदतीने ही विशेष ‘सोय’ उपलब्ध करून देतात. याबाबत चिकलठाणा पोलिसात तक्रार करण्यात आली. शेंद्र्याजवळच्या पीपल्स फॉरेन्सिक सायन्स अँड सायबर सिक्युरिटी कॉलेजमधील विद्यार्थी वाल्मीकराव दळवी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात परीक्षा देत आहे. एका व्यापारी संकुलातील या परीक्षा केंद्रावर बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स) प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाचे १८० विद्यार्थी २३ मार्चपासून परीक्षा देत आहेत.
मोडस ऑपरेंडी
सकाळी कोरी पाने सोडा, सायंकाळी सविस्तर उत्तरे लिहा.. विद्यार्थ्यांंना मिळते ‘मार्गदर्शन
सकाळी १० ते ११.३० आणि दुपारच्या सत्रात दुपारी १ ते २.३० पर्यंत पेपर असतात. या परीक्षा केंद्रावर विद्यापीठाचे भरारी पथक फिरकतही नाही. त्यामुळे परीक्षेदरम्यान ‘मासकॉपी’ सर्रास सुरूच असते. पण तरीही प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे लिहिली नसतील तर त्यांना दोन्ही पेपर संपल्यानंतर दुपारी ४ नंतर वेगळा वेळ देऊन त्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी पुन्हा उत्तरपत्रिका दिल्या जातात. त्यासाठी सकाळी पेपर लिहिताना उत्तरपत्रिकेत कोरी जागा सोडण्याचे ‘मार्गदर्शन’ही या परीक्षार्थींना आधीच केलेले असते.
अगदी छोट्या इमारतीतील दळवी कॉलेज शेजारी ए. के. झेरॉक्स सेंटर आहे. सोमवारी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने निरीक्षण केले. पीपल्स कॉलेजमधील रोहित नावाचा युवक येथे आला. या दुकानदाराने त्याच्याशी ‘सौदा’ केला. सुरुवातीला ३०० रुपये मागितले. पण त्याने दहा विद्यार्थ्यांचे ‘सेटिंग’ करायचे सांगितल्यावर प्रत्येकाचे ५०० रुपये मागण्यात आले. या युवकाने ते मान्य केले. त्याच्यासोबतच्या एकाने रोख रक्कम जमा केली. (ऑनलाइन पेमेेंट घेतले नाही). त्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांचे मोबाइल क्रमांक, परीक्षा क्रमांकांची यादी कॉलेजला पाठवण्यात आली. त्यानंतर हे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर गेले व पुन्हा उत्तरपत्रिका लिहून आले.
भरारी पथक ‘नॅक’मध्ये व्यग्र
‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने विद्यापीठाच्या भरारी पथक प्रमुखांना फोन लावला. तर ते ‘नॅक’च्या कामात व्यग्र असल्याने केंद्रावर फिरकलेच नसल्याचे कळले. तर, संबंधित काॅलेजचे प्रमुख दळवी यांनी मात्र असे काही गैरप्रकार हाेत नसल्याचे सांगितले.
कुणाचीही गय करणार नाही
गैरप्रकार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. कोळवाडीच्या कॉलेजमधील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर हे केंद्र रद्द केले. या कॉलेजची संलग्नता काढण्याची कारवाई सुरू आहे. दळवी कॉलेजबाबतही तातडीने कारवाई करू. -डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.