आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतात स्पोर्ट्स सायन्सवर विस्तारित काम हाेण्याची गरज आहे. यासाठीच औरंगाबादला स्पोर्ट््स सायन्स हब तयार करण्यात येईल. याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय या ठिकाणी सिंथेटिक अॅथलेटिक्स ट्रॅक व क्रीडा अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत विचार करणार असल्याचे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले. त्यांच्या हस्ते साईत गुरुवारी पहिल्या स्टेनलेस स्टील जलतरण तलाव व ब्ल्यू अॅस्ट्रोटर्फ हॉकी मैदानाचे उद्घाटन करण्यात आले. सोहळ्यादरम्यान खासदार डॉ. भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, कुलगुरू प्रमोद येवले, आमदार अंबादास दानवे, अतुल सावे, पंकज भारसाखळे यांची उपस्थिती होती.
औरंगाबादकडे रवाना; ५ काेटी मंजूर
औरंगाबाद येथील सेंटरमध्ये अत्याधुनिक प्रकारच्या साहित्याची सुविधा उपलब्ध असेल. यासाठी याच सेंटरवरील विविध खेळांच्या साहित्यासाठी दिल्लीवरून येताना ५ कोटी रुपये मंजूर करून आल्याचेही त्यांनी सांगितले. यातून या ठिकाणी असलेल्या सात खेळांच्या साहित्याची खरेदी केली जाईल. यातून खेळाडूंना हे साहित्य उपलब्ध करून दिले जाईल.
क्रीडा विद्यापीठाच्या शाखेची मागणी
राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांनी सरकारने भरपूर आर्थिक मदत करत मराठवाड्याच्या क्रीडा क्षेत्रावरील अन्याय दूर करावा, त्याचबरोबर अॅथलेटिक्स ट्रॅक व मणिपूर येथील राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची शाखा औरंगाबादला देण्यात यावी, अशी विनंती रिजिजू यांना केली. रिजिजू यांनी विद्यापीठाच्या शाखेबाबत एकही शब्द न उच्चारता केवळ ट्रॅकचा विचार करणार असल्याचे म्हटले.
येथून ऑलिम्पियन तयार
सर्वाधिक एक्सलन्स सेंटर महाराष्ट्रात आहेत. यात मुंबई, नागपूर व औरंगाबादचा समावेश आहे. विशेष म्हणजे औरंगाबादला सर्वाधिक सात खेळांचे केंद्र बनवले. इतर केंद्रांत ४ खेळ आहेत. भविष्यात औरंगाबाद केंद्राचे १५ खेळाडू ऑलिम्पिकमध्ये खेळतील, असा विश्वास रिजिजू यांनी व्यक्त केला.
औरंगाबादेत सुरू व्हावा एनआयएसचा अभ्यासक्रम : खा. इम्तियाज
पर्यटननगरी औरंगाबादेत सर्व सुविधा उपलब्ध आहेत. राज्यातील खेळाडूंना एनआयएस अभ्यासक्रमासाठी दुसऱ्या राज्यात जावे लागते. ते शक्य नसल्याने येथील खेळाडू मागे आहेत. राज्यामध्ये क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी औरंगाबादमध्ये सर्व सुविधा उपलब्ध असल्याने क्रीडा अभ्यासक्रम सुरू करावा, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली. मंत्र्यांनी खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्याने प्रोत्साहन मिळेल, असे ते म्हणाले. यादरम्यान त्यावर उत्तर देताना रिजिजू यांनी आपल्या भाषणात क्रीडा अभ्यासक्रमांबाबत सकारात्मक विचार करू, असे आश्वासन दिले. त्यामुळे आता हा काेर्स औरंगाबादेत सुरू हाेण्याचे संकेत मिळाले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.