आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र पद्मालय

धर्मक्षेत्र12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या व साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून सन्मानित असलेले जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील श्रीक्षेत्र पद्मालय येथील गणेश मंदिर हे जगात एकमेव आहे. एकाच देवळात एकाच व्यासपीठावर एक डावा, तर दुसरा उजवा साेंडेचा अशा दाेन स्वयंभू आमाेद-प्रमाेद गणेशमूर्ती आणि गणरायाला समर्पित मंदिराजवळील ‘कमळ’ तलाव हे मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे.

नवसाला पावणारा गणपती अशी मंदिराची ख्याती आहे. ‘पद्म आणि आलय’ या दाेन शब्दांचा मिलाफ ‘पद्मालय’ या शब्दात असून त्यास संस्कृतमध्ये ‘कमळाचे घर’ असे म्हणतात. मंदिरासमाेर दगडाने बांधलेला, गणरायाला समर्पित कमळांनी फुललेला ‘कमळ’ तलाव आहे. पद्मालय येथील गणेशाचे आध्यात्मिक महत्त्व जाणून श्रीमंत माधवराव पेशवे यांनी खान्देश सुभ्यातील थाळनेरपर्यंत ३७ परगण्याचा नीम महसूल मंदिर व्यवस्थापनासाठी सनद म्हणून दिला होता, अशी नोंद पेशवे दप्तरात सापडते.

या मंदिराच्या वास्तुकलेचे वर्णन ‘साईलीला’ चरित्र या ग्रंथात आढळते. १९०४ ला सातारा जिल्ह्यातील वाई येथील गोविंदशास्त्री बर्वे यांनी जीर्णोद्धार केला आहे. मंदिराचे बंाधकाम पूर्ण पाषाणात आहे. मुख्य कळस ७८ फूट उंच आहे. मुख्यसह ८ कळसांना साेन्याचा मुलामा आहे. छतावर दाेन चुन्याचे हत्ती आहेत. प्रवेशद्वाराजवळ दगडाचा मूषक असून त्यांच्यासमाेर मुख्य मंदिरात गणराय विराजमान आहे. २० बाय २० फुटांचा गाभारा, ३५ बाय ३५ फूट आकाराचा मंडप, तर उंची ८८ फूट आहे. मंदिरातील मूर्तीची उंचीही ३ फुटांपर्यंत आहे. परिसरात वेगवेगळ्या २१ मूर्ती आहेत. मंदिरासमाेर ४४० किलाे वजनाची ११ मणाची पंचधातूची अवाढव्य घंटा आहे. मंदिराबाहेर धर्मशाळा, भक्त निवास, मंगल कार्यालय आहे. पद्मालयापासून तीन किमी अंतरावर भीमकुंड आहे. अंगारिका, संकष्ट चतुर्थीला मंदिरात यात्रा भरत असून यासाठी देशभरातून सुमारे २ लाख भाविक दर्शनाला येतात. तसेच वर्षभर भाविक नवस फेडण्यासाठी येतात.

बातम्या आणखी आहेत...