आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशन दहावी-बारावी:यंदा विद्यार्थी नव्हे, बोर्डाचीच परीक्षा; प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्रांच्या संख्येत झालेली वाढ ठरणार डोकेदुखी

मंगेश शेवाळकर/विद्या गावंडे | हिंगोली, औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात शाळा तेथे परीक्षा केंद्र देण्यात आल्यामुळे या वर्षी परीक्षा केंद्रांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांचा पुरवठा करताना प्रशासनाची चांगलीच धावपळ होणार आहे. हिंगाेली जिल्ह्यात तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची २१३, तर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची १०६ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. बंदोबस्त करताना पोलिसांचीही दमछाक होणार असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. मात्र ऑनलाइन अभ्यासक्रम व कोविडमुळे परीक्षा घेऊ नयेत, अशी भूमिका घेण्यात आली होती. मात्र त्यानंतरही शासनाने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोविडच्या नियमांचे पालन व्हावे यासाठी शाळा तेथे परीक्षा केंद्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ही बाब लक्षात घेता परीक्षा केंद्रांची मोठी संख्या झाली आहे. यापूर्वी जिल्ह्यात इयत्ता दहावीची ५३ परीक्षा केंद्रे होती, तर या वर्षी तब्बल २१३ परीक्षा केंद्रे आहेत. इयत्ता बारावीची पूर्वी ३३ परीक्षा केंद्रे होती, तर या वर्षी १०६ केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. दरम्यान, ४ मार्चपासून इयत्ता बारावीच्या परीक्षांना सुरुवात होणार असून परीक्षा केंद्रांची संख्या वाढल्याने परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

व्याप वाढला असला तरी अडचण नाही, नियोजन पूर्ण झाले
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी परीक्षा न घेता मागील वर्गातील मूल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला होता. यंदा मात्र परीक्षा या ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा तेथे परीक्षा केंद्र असे नियोजन केले आहे. यामुळे परीक्षा केंद्रांची संख्या ही चौपट वाढली आहे. कामाचा व्याप प्रचंड वाढला असला तरी परीक्षेत कुठलीही अडचण येणार नाही असे नियोजन केले आहे. आम्ही सतर्क असून सर्व अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. - आर. पी. पाटील, सहसचिव, विभागीय शिक्षण मंडळ, औरंगाबाद.

१५ पटसंख्या असलेल्या विद्यार्थ्यांना पूर्वीचेच परीक्षा केंद्र : हिंगोली जिल्ह्यात ज्या ठिकाणी १५ पेक्षा कमी पटसंख्या आहे.त्या शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पूर्वीच्याच परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागणार आहे. यामध्ये इयत्ता दहावीच्या २०, तर बारावीच्या ५ कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे. दरम्यान, परीक्षेच्या काळात नियोजन करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

दिव्य मराठी एक्स्पर्ट व्ह्यू : होम सेंटरचा होईल फायदा
गेल्या वर्षी परीक्षा झालेली नाही, तर कोरोनामुळे दोन वर्षे शाळाच बंद होती. यामुळे आठवीतील विद्यार्थी थेट दहावीत आले आहेत. त्यांची लिहिण्याची सवय मोडली आहे. आता पेपर लिहिण्यासाठी अर्धा तास वाढवून दिला तरी त्यांनी जो सराव केला आहे अथवा शाळांची जे पेपर घरी सोडवून घेतले त्याचे कोणतेही मूल्यमापन झालेले नाही. मुलांची मानसिकता पाहता होम सेंटरचा फायदा होईल. अवघड वाटणाऱ्या विषयातही मुलांना चांगेल गुण मिळतील. तरी दुसऱ्या बाजूने पाहिल्यास कॉपी रोखण्यासाठी भरारी पथकांची जबाबदारी अधिक वाढणार आहे. त्या-त्या शाळा-महाविद्यालय निकाल चांगला लागावा म्हणून प्रयत्नही करतील. - उज्ज्वला निकाळजे, माजी पाठ्यपुस्तक समीक्षक, विभागीय शिक्षण मंडळ, औरंगाबाद.

बातम्या आणखी आहेत...