आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एस. टी. संपाचा 10 वा दिवस:सहनशक्ती संपली म्हणून संपात उतरलो; महिला कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरत

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाहक म्हणून एसटी महामंडळात महिलांची झालेली भरती हा राज्यासाठी अभिमानाचा विषय होता. मात्र, अपुऱ्या वेतनामुळे भरडल्या गेलेल्या आर्थिक कोंडीत सापडलेल्या या महिला कर्मचाऱ्यांची तिहेरी कसरत सुरू झाली आहे. आंदोलनात आघाडीवर असलेल्या या महिला कर्मचारी निलंबनाची टांगती तलवार डोईवर असतानाही यात लढताना दिसत आहेत. राज्यभरातील या महिला कामगारांची परिस्थिती जाणून घेतली आहे “दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींनी...

एसटी सुरू केली तर तिच्यापुढे आडव्या येऊ
अश्विनी तडवळकर | सोलापूर

जर कुणी एस.टी. सुरू केली तर तिच्या खाली आडवे होऊ पण संप मागे घेणार नाही, हा निर्धार व्यक्त केलाय सोलापूर विभागातील कंडक्टर शैला खुर्द यांनी. नोकरी सांभाळून संसार करायचा, त्यात कमी पगारावर गरजा कशा भागवायच्या या कात्रीत त्या सापडल्या आहेत. वाढत्या महागाईत अवघ्या ९ हजारांच्या पगारावर घर कसं चालवायचं या विचाराने थकल्याने त्या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्या. गेल्या १० वर्षांपासून काम करूनही हाती पगार फक्त १४ हजारांचा. घरासाठी दाेन लाखांचे कर्ज घेतलं त्याचा हप्ता कापून त्यांच्या हातात ९ हजार पडतात. त्यात भागवणं मेटाकुटीला आल्याने त्या संपात सहभागी झाल्या आहेत. यातून काहीतरी निर्णय व्हायलाच हवा अशी त्यांची अपेक्षा आहे.

विलीनीकरणाशिवाय थांबणार नाही
महेश घोराळे | अकाेला

खडकी परिसरात राहणाऱ्या कल्पना खंडारे या नवीन बसस्थानकात वाहक म्हणून कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपात पहिल्या दिवसापासून त्या सहभागी आहेत. गेल्या बारा वर्षांपासून या सेवेत असून १९ हजार रुपये प्रतिमाह वेतनावर त्या काम करीत आहेत. पगार वेळेवर न ‌झाल्याने अनेक आर्थिक, कौटुंबिक अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण द्यायचे म्हटले तर पैसा कोठून आणावा हा प्रश्न आहे. उसनवार, तडजोड करीत संसार करून त्या थकल्या आहेत. त्यामुळे शासनाने तत्काळ एस.टी. कर्मचाऱ्यांना राज्य शासनात विलीनीकरण द्यावे. राज्य सरकारी कर्मचारी म्हणून आम्हाला घोषित करावे. त्याप्रमाणे भत्ते, वेतन सवलती द्याव्या, अशी मागणी त्या शासनाकडे करीत आहेत.

काम करूनही उपाशी राहण्याचीच वेळ
दीपक कांबळे | अहमदनगर

२०१३ साली साडेसात हजार रुपयांवर कंडक्टर म्हणून रुजू झालेल्या सोनाली शिंदेंचा पगार आठ वर्षांनंतर १२ हजार रुपये झालाय. या १२ हजारात प्रपंच चालवायचा कसा हा त्यांच्यापुढचा प्रश्न आहे. ५ हजार घरभाडे जाते आणि किराणा, सिलिंडर, भाजीपाला यात उरलेला पगार संपतो. सासू-सासरे, मुलांसह सहा जणांचे कुटुंब. मुलांच्या शिक्षणासाठी हाती काहीच उरत नाही. लोकांना वाटते, एस. टी. कर्मचारी हे तर सरकारी नोकर, पण एवढा कमी पगार हे कुणालाच माहीत नाही. एस. टी. प्रशासनाने दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्याचे त्यांना भय वाटत नाही. त्या म्हणतात, काम करून उपाशीच रहावं लागतं, त्यापेक्षा आंदोलनामुळे होणारी उपासमार पत्करली. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्यांच्या कुटुंबाचा पाठिंबा आहे, कारण कमी पगारामुळे होणाऱ्या ससेहोरपळीची झळ सगळ्यांनाच बसत असल्याचे त्या सांगतात.

निलंबनानंतरही निर्धार कायम
उषा बोर्डे | औरंगाबाद

वर्कशॉपच्या बाहेर आंदाेलन करणाऱ्यांमध्ये महिलांचीच संख्या अधिक. कुणी आलं की ताकद एकवटून घोषणा देत त्या आंदोलन धगधगत ठेवत आहेत. “ऑफ द रेकॉर्ड’ त्यांची गाऱ्हाणी सांगतात. मात्र, निलंबनाच्या भीतीमुळे प्रतिक्रिया देण्यासाठी घाबरतात. मंदाकिनी कराड यांनाही या आंदाेलनामुळे निलंबित करण्यात आले आहे, पण त्या डगमगलेल्या नाहीत. “आता नाही बोलायचं कर कधी?’ या धैर्याने त्यांची लढाई सुरूच आहे. १२ वर्षे काम करून १४ हजार पगार. सरकारी नोकरी असून उसने काय मागता, हे टाेमणे. बारा-बारा तासांचे काम, प्रवाशांच्या रोषाचा सामना, स्वच्छतागृह नाही की पिण्याचे शुद्ध पाणी नाही. यामुळे वाढलेले पोटाचे आजार. अशा प्रतिकूल परिस्थिती काम करूनही अपुरा पगार ही त्यांची व्यथा आहे.

आत्महत्येचा प्रयत्न पण झगडा कायम
सचिन जैन | नाशिक

आई-वडिलांच्या निधनामुळे हरवलेलं छत्र आणि लहान बहिणीची जबाबदारी. पगार फक्त १३ हजार. आंदोलनात सहभागी झाल्याने निलंबनाची कारवाई. शेवटी तणाव सहन न झाल्याने आत्महत्येचा प्रयत्न. या दुष्टचक्रातून गेल्या सुकेशिनी ऐनगडे. महागाईच्या काळात कुटुंबाची परिस्थिती कशी सांभाळणार या मोठ्या प्रश्नाने त्रस्त झाल्याने आंदोलनात सहभागी झाल्याचे त्या सांगतात. यातून न्याय मिळण्याऐवजी निलंबनाची कारवाई झाल्याने त्या अधिकच व्यथित झाल्या आणि त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. सरकारने आपल्या मागणीचा संवेदनशीलतेने विचार करावा ही कळकळीची विनंती त्या करतात. तुटपुंज्या वेतनामुळे राेजच अडचणींचा सामना करावा लागताे, याचा तणाव असह्य हाेत असल्याचा त्या सांगतात.

बातम्या आणखी आहेत...