आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज जागतिक पर्यावरण दिन:राज्याची हवा सुधारली; मात्र भूजल, ध्वनी, औद्योगिक प्रदूषण वाढले, घनकचऱ्याची समस्या कायम

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • २०१८-१९ आणि २०२०-२१ मध्ये पडला फरक

राज्यात कोरोनाचा प्रकोप घटल्यानंतर हवेची गुणवत्ता सुधारली आहे. भूजल व ध्वनी प्रदूषण तसेच प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. सातत्याने प्रयत्न करूनही घनकचरा व्यवस्थापनाची समस्याही कायम आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०२०-२१ चा वार्षिक अहवाल नुकताच सादर केला. त्याची २०१८-१९ च्या अहवालाशी तुलना केली असता कोरोनापूर्वी व नंतरच्या राज्याच्या पर्यावरणाच्या स्थितीचे चित्र स्पष्ट झाले.

1. हवेची गुणवत्ता सुधारली
राज्यात विविध शहरांत हवेच्या गुणवत्तेच्या मोजमापासाठी ९२ अॅम्बियंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन्स सुरू आहेत. येथे कार्बन मोनोक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, पीएम १०, पीएम २.५, ओझोन, लेड व अमोनियाच्या मोजमापावरून हवेचा गुणवत्ता निर्देशांक काढला जातो.

निष्कर्ष : २०१८-१९ च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये हवेची गुणवत्ता सुधारली. २ वर्षांपूर्वी उत्कृष्ट श्रेणीचा एक्युआय १४.९८% होता. २०२०-२१ तो दुप्पट वाढला. अतिवाईट व गंभीर प्रकारातील एक्युआय आलाच नाही.

पुढे काय : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यात ४० नवीन मॅन्युअल स्टेशन्स सुरू केले आहेत. ४७ कन्टिन्युअस अॅम्बियंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन्स प्रस्तावित आहे.

2. ध्वनी प्रदूषण वाढले
शहरी भागात ध्वनी प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी सणवार तसेच विशिष्ट कालावधीत चाचण्या घेतल्या जातात. २०२०-२१ मध्ये २७ महापालिका हद्दीत १०४ ठिकाणी १ सुटीच्या व १ कामाच्या दिवशी निवासी, बाजारपेठा आणि सायलेन्स झोनमध्ये चाचण्या घेतल्या.

निष्कर्ष : फेब्रुवारी-डिसेंबरमध्ये चाचण्यात आवाज मर्यादा जास्त होती. सणवार, उत्सव, सभा, समारंभात ती अधिकच वाढते. वाहनांचे आवाज, हॉर्न, डीजे, लाऊडस्पीकरचा समावेश आहे.

पुढे काय : अनेक निवासी इमारती साऊंडप्रुफ भिंती बसवत आहेत. भविष्यात उड्डाणपुलांच्या भिंती साऊंडप्रुफ करण्याचे व रस्त्याच्या कडेला अधिकाधिक वृक्षारोपणाचे नियोजन आहे.

3. घनकचऱ्याची समस्या
राज्यात २७ महानगरपालिका, २३३ नगर परिषदा, १३१ नगर पंचायती तर ७ कंटोनमेंट बोर्ड अशा सर्व मिळून ४०३ स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. सर्व मिळून दररोज २२६३२.७१ मेट्रीक टन घनकचरा निघतो. त्यापैकी १६४११.४६ मेट्रिक टनवरच प्रक्रिया होते.

4 पाण्याची गुणवत्ता ढासळली
डिसॉव्ल्ड ऑक्सिजन, फीकल कॉलिफॉर्म, पीएच, बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड, टेम्परेचर चेंज, टोटल फॉस्फेट, नायट्रेट, टर्बिडीटी आणि टोटल सॉलिड्स या ९ लक्षणांवर डब्ल्यूक्यूआय काढला जातो. भूजल व भूतलावरील इंडेक्स वेगवेगळा येतोे. तापी, कृष्णा, गोदावरी व किनारपट्टीवर वॉटर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन्स आहेत.

निष्कर्ष : तापी खोऱ्यातील अमरावती, अकोला, धुळे, जळगाव, नंदूरबार व नाशिक जिल्ह्यात तसेच गोदावरी खाेरे १ मधील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातुर, हिंगोलीत पाण्याची गुणवत्ता उत्कृष्ट होती. कृष्णा खोऱ्यातील पुणे वगळता कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूरमध्ये पाणी उत्कृष्ट गुणवत्तेचे आहे. पश्चिम वाहिनी नद्यांच्या मुंबईतून वाहणाऱ्या पाण्याची गुणवत्ता अतिवाईट आहे.

5. लाल श्रेणीतील उद्योगात वाढ
केंद्राने ६० पेक्षा अधिक पोल्युशन इंडेक्सचे उद्योग लाल, ४१ ते ५९ इंडेक्स असणारे केशरी, २१ ते ४० इंडेक्सचे हिरवा, तर २० पर्यंत इंडेक्सच्या उद्योगांचे पांढऱ्या श्रेणीत वर्गीकरण केले आहे.

निष्कर्ष : उद्योगातून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी राज्यात २४४.८५ एमएलडी क्षमतेचे २६ सीईटीपी आहेत. विविध उद्योगातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची संख्या १६,५९७ असून त्यांची क्षमता २१०० एमएलडी आहे. यातून उद्योगातील १००% सांडपाण्यावर प्रक्रिया हाेते. घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांची म्हणजेच एसटीपीची क्षमता ६७४०.८४ एमएलडी आहे. त्या तुलनेत निघणारे सांडपाणी ७५४१.२ एमएलडी आहे.

बातम्या आणखी आहेत...