आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य आंतर महाविद्यालयीन क्रीडा महोत्सव:डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे बास्केटबॉल, कबड्डी, व्हॉलिबॉल  संघ फायनलमध्ये

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद येथे सुरू असलेल्या राज्य आंतर महाविद्यालयीन क्रीडा महोत्सव स्पर्धेत यजमान डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे पुरुष बास्केटबॉल संघ, महिला-पुरुष कबड्डी संघ, पुरुष व्हाँलिबाँल संघाने फायनलमध्ये प्रवेश केला. आज सायंकाळी उशिरापर्यंत विजेतेपदाचे सामने होणार आहेत.

मंगळवारी सकाळच्या सत्रात झालेल्या बास्केटबॉलच्या उपांत्य फेरीत यजमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघाने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संघाचा 73 विरुद्ध 67 बास्केटने पराभव केला. विजेत्या संघातील राजेश्वर परदेसी, साहिल धनवटे, अजय पवार, शुभम गवळी, शुभम लाटे, अभिषेक अंभोरे यांनी शानदार पासेस व जवळून बास्केट करत संघाला विजयी केले. कोल्हापूरतर्फे साहिल कराळे, ओमकार चोपडे, सार्थक वायकर, आकाश माने यांनी निकराची झुंज दिली मात्र सामनामध्ये त्यांना सूर गवसला नाही.

दुसऱ्या उपांत्य लढतीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर संघाने हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेज विद्यापीठ मुंबई संघाचा 64 विरुद्ध 30 बास्केटने सहज पराभव करत फायनल गाठली. महिला गटात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्यात विजेतेपदासाठी लढत होईल.

व्हाँलिबाँल : औरंगाबादची मुंबईवर मात

आज झालेल्या व्हॉलीबॉल पुरुष गटातील उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादच्या संघाने मुंबई विद्यापीठ, मुंबई या संघावर (3-1) या सेटने मात देत अंतिम सामन्यात प्रवेश केला. औरंगाबादने सुरुवातीपासून वर्चस्व राखले.

खो-खो : औरंगाबादचे दोन्ही संघ फायनलमध्ये

सकाळच्या सत्रात महिला खो-खो च्या उपांत्य फेरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादच्या संघाने शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 1 गुण आणि 3.10 मिनिटे राखून विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. यजमान संघाचा अंतिम सामना मुंबई विद्यापीठाशी होईल. पुरुष गटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादच्या संघाने शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संघावर 6 गुणांनी मात केली. आता औरंगाबादचा सामना मुंबई विद्यापीठाशी होणार आहे. सर्व अंतिम सामने मंगळवारी सायंकाळी होणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...