आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाला पहिल्या दिवशी गालबोट लागले. निवास व्यवस्थेतील सावळ्या गोंधळामुळे खेळाडूंना रात्रभर थंडीमध्ये कुडकुडत व्हरंड्यामध्ये झोपण्याची वेळ आली. प्रचंड चिडलेल्या खेळाडूंनी थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना संपर्क साधत अडचणीची माहिती दिली. त्यानंतर मंत्र्यांनी संबंधित कुलगुरूंना रात्री 2 वाजता फोन करून व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.
संबंधित तक्रारदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, यजमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठाचा कबड्डी संघ शुक्रवारी दुपारीच औरंगाबादेत दाखल झाला. मात्र त्यांना रात्रीपर्यंत खोल्या न देता झुलवत ठेवले. त्यांना पत्र्याच्या शेडच्या वसतिगृहात पाठवण्यात आले. त्या ठिकाणी स्वच्छता नव्हती, इतर भंगार सामान पडलेले होते, स्वच्छतागृहाची व्यवस्था नव्हती. त्यांच्या संघ व्यवस्थापकांनी इतर ठिकाणी व्यवस्था करण्यास आयोजकांना सांगितले. मात्र, प्रत्येक जण एकमेकांवर जबाबदारी ढकलत होता.
अखेर सर्वांनी फोन उचलणे बंद केले. प्रवासाने थकलेले खेळाडू मैदानावरील पेंडॉलमध्ये झोपले. त्यानंतर ते बॅडमिंटन हॉलच्या व्हरंड्यामध्ये झोपले. दरम्यान, त्यांनी थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना व्यवस्था नसल्याची फोन करून माहिती दिली. मंत्र्यांनी गोंडवानाच्या कुलगुरूंना याप्रकरणी लक्ष देण्यास सांगितले. गोंडवानाच्या कुलगुरूंनी आयोजक कुलगुरूंना रात्री फोन करून मंत्र्यांचा आदेश सांगितला. खेळाडूंची व्यवस्था करण्यास सांगितली तरीही त्यांची व्यवस्था झाली नाही. महिला संघालाही खराब गाद्या देण्यात आल्या. या विद्यापीठाच्या इतर खेळाच्या खेळाडूंना शनिवारी दुपारपर्यंत व्यवस्था करण्यात आली नव्हती.
नियोजनाकडे लक्ष्य देत आहोत
एकाच विद्यापीठाला त्रास झाला. मंत्री महोदयाच्या पीएचा मला फोन आला होता. आम्ही चांगल्या व्यवस्थेचा प्रयत्न करतोय. गोंडवाना संघाला खोली दिली होती. त्यांना आवडली नाही. ती दुसऱ्या टीमने घेतली. त्यामुळे त्यांची पुन्हा व्यवस्था करण्यासाठी थोडा वेळ लागला, असे स्पष्टीकरण स्पर्धा आयोजक विद्यापीठाचे प्रभारी क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे यांनी दिले.
अहवाल सादर करण्याच्या सुचना
ढिसाळ नियोजनामुळे चिडलेल्या कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी शनिवारी उशिरा नियोजन समितीमधील सर्व क्रीडा संचालकांची तातडीची बैठक घेतली. त्यांना त्याच्या कामातील अडचणी समजून घेत, त्या दुरुस्त करण्याच्या सुचना दिल्या. आपल्या कामाशी संबंधीत गोष्टीचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.