आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य कबड्डी स्पर्धा:परभणी, नगर, पुणे, मुंबई संघ उपांत्य फेरीत दाखल; नाशिक, जळगाव, सोलापूर संघाचे आव्हान संपुष्टात

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या मान्यतेने परभणी जिल्हा कबड्डी संघटनेतर्फे मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या सहकार्याने आयोजित केलेल्या 49 व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत यजमान परभणी, मुंबई उपनगर, पुणे, मुंबई शहर कुमारी आणि कुमार गटात अहमदनगर, ठाणे, मुंबई उपनगर पुणे संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. कुमार गतविजेता कोल्हापूरसह नाशिक, जळगाव, सोलापूर संघ उपांत्यपूर्व फेरीत गारद झाल्याने त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

कुमारांच्या उपांत्यपूर्व सामन्यात अहमदनगरने बलाढ्य कोल्हापूरला 30-35 असे नमवण्याची ही किमया साधली. सुरुवातीपासून वर्चस्व ठेवणाऱ्या नगरकडे पूर्वार्धात 17-11 महत्वपूर्ण आघाडी होती. उत्तरार्धात सावध खेळ करत 5 गुणांच्या फरकाने नगरनें सामना आपल्या बाजूने झुकवला. ऋषिकेश दाते, युवराज गवारे यांच्या मुत्सद्दी चढाया त्याला राकेश गैड, संकेत खलाटे यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे नगरने हा विजय मिळविला. आदित्य पवार, साहिल पाटील, युतीराज पोलेकर यांनी कोल्हापूरकडून कडवा प्रतिकार केला. ठाण्याने रत्नागिरीला 31-20 असे नमवित उपांत्य फेरीत धडक दिली.

मुंबई उपनगरने रजतसिंग, यश डोंगरे यांच्या चतुरस्त्र चढाया आणि अनुराग फुलारे, साहिल नलावडे यांचा भक्कम बचाव यांच्या जोरावर सांगलीचा 45-26 असा सहज पराभव करीत कुमार गटात उपांत्य फेरी गाठली.

नेहा, हरजित, याशिकाची चमकदार खेळी

कुमारी गटातील उपांत्यपूर्व फेरीत मुंबई उपनगरने सोलापूरचा 51-25 असा सरळ पराभव केला. विजेत्यापदाच्या शर्यतीत असलेल्या उपनगरने पहिल्या सत्रात 26-13 अशी आघाडी घेतली होती. हरजित संधू, याशिका पुजारी यांच्या झंजावाती चढाया त्याला नेहा पांडवची मिळालेली पकडीची जोरावर विजय सोपा गेला. सोलापूरच्या धनश्री तेली, शिवानी साळुंखे यांनी बरा प्रतिकार केला. दुसऱ्या सामन्यात यजमान परभणीने अत्यंत चुरशीने खेळला गेलेल्या सामन्यात सांगलीचा कडवा प्रतिकार शेवटच्या क्षणी 42-40 असा मोडून काढत परभणीच्या कबड्डी रसिकाना सुखद धक्का दिला. कोपरारक्षक सुमन चव्हाण हिने शेवटच्या 3 मिनिटात केलेल्या धाडशी पकडी, तसेच गौरी दाहे, निकिता लंगोटे यांच्या झंजावाती चढाया यामुळे परभणीने हा विजय खेचून आणला. शेवटच्या 3 मिनिटात परभणीने 10 गुण मिळविले. सांगलीच्या अनुजा शिंदे, ऋतुजा ओळी यांनी पूर्वार्धात उत्कृष्ट खेळ केला. पण शेवटच्या क्षणी त्या दडपणाखाली आल्या.

उपउपांत्यपूर्व फेरीचे निकाल :

कुमारी गट - परभणी वि. वि. नांदेड (34-28), मुंबई उपनगर वि. वि. अहमदनगर (49-17), ठाणे वि. वि. नाशिक (31-36), रत्नागिरी वि. वि. रायगड (31-29).

कुमार गट - अहमदनगर वि. वि. जळगाव (31-18), रत्नागिरी वि. वि. नाशिक (29-22), रायगड वि. वि. मुंबई शहर (29-28), सांगली वि. वि. पालघर (42-39).

बातम्या आणखी आहेत...