आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 वर्षाखालील राज्य बुद्धिबळ स्पर्धा:गौरंग, अविरत, सहजविरसिंगमध्ये विजेतेपदासाठी चुरस; वेदिका पालची आघाडी

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद चेस अकादमीतर्फे कलश मंगल कार्यालय येथे सुरू असलेल्या 9 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत रोमांच पहायला मिळत आहे. मुलांच्या गटात अव्वल खेळाडू अविरत चौहान, गौरंग बॅनर्जी, सहजविरसिंग मरास यांच्यामध्ये विजेतेपदासाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे. मुलींमध्ये वेदिका पालने 4 गुणांसह आघाडी घेतली आहे. भक्ती गवळी व विश्वजा देशमुख 3.5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर चालत आहेत. स्पर्धेत एकूण 8 फेऱ्या होणार आहेत.

पाचव्या फेरी अखेर मुलींमध्ये नागपूरची वेदिका पाल व औरंगाबादच्या भक्ती गवळी यांच्यामध्ये सिसिलियनमधील क्लासिकल व्हेरीएशन या क्वचित खेळली जाणाऱ्या पद्धतीने सुरुवात झाली. भक्तीने घोडा ‘ई 5' घरावर भक्कम बसवण्याचा प्रयत्न केला. परंतु काळ्या सोंगट्यांसह खेळताना वेदिकाने उंटाच्या जोडीचा उत्तम प्रकारे उपयोग करत भक्तीचे आक्रमणाचे सर्व प्रयत्न निष्प्रभ केले. परिणामी 40 चालींपर्यंत रंगलेल्या डावात वेदिकाने विजय साकारला.

अविरतवर स्वत:चा डाव उलटला

मुलांमध्ये पहिल्या पटावर पांढऱ्या सोंगट्यांसह आदित्य जोशी व त्याचा पुण्यातील सहकारी खेळाडू अग्रमानांकित अविरत चौहान यांच्यात निमझोविच लार्सन अटॅकने प्रारंभ झाला. दोघांनी घोडा व उंट यांना योग्य आणि बचावात्मक पद्धतीने पटावर स्थानाबद्ध केले. आदित्यने हत्तीला महत्त्वाची सातवी पत्ती मिळवून दिली. 39 व्या चालिला वरचढ असलेल्या अविरतने ‘एफ 5' घरातील प्याद्याचा बळी देत उंटाच्या बदल्यात हत्तीची अदलाबदली केली व डावावर पकड मिळवण्याचा प्रयत्न फसला. आदित्यचे डावावर वर्चस्व मिळवत बाजी मारली.

औरंगाबादची भूमिकाचे तीन गुण

तिसऱ्या पटलावर औरंगाबादच्या भूमिका वाघळेने नागपूरच्या अन्वी हीर्डेला सुमारे साडेतीन तास चाललेल्या लढतीत पराभूत केले. भूमिका तीन गुणांसह आता संयुक्त तिसऱ्या स्थानी चालत आहे. फ्रेंच एक्सचेंज व्हेरीएशनमध्ये दोघींनी तोडीस तोड चालींची साखळी खेळली. 30 चालीपर्यंत दोघी बरोबरीत होत्या. भूमिकाकडे हत्ती, घोडा, दोन प्यादे आणि अन्वीकडे हत्ती उंट व एक प्यादे अशी रोमांचक परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर आपल्या घोड्याला योग्य दिशी दाखवत अन्वीचा हत्ती जेरबंद करत भूमिकाने विजय मिळवला.

इतर विजयी खेळाडू

मुली - वेदिका पाल (4 गुण ) वि.वि. भक्ती गळवी (3.5 गुण), प्रांजल राऊत (3) वि.वि. विश्वजा देशमुख (3.5), भूमिका वाघले (3) वि.वि. अन्वी हिर्डे (3), सानवी गोरे (3) वि.वि. हिंदवी यादव (3) वि.वि. साची चिलकनवार (2.5).

मुले - आदित्य जोशी (3.5) वि.वि. अविरत चौहान (4), गौरंग भंडारी (3.5) वि.वि. अंबर गंगवाल (3.5), विहान अग्रवाल (3) वि.वि. हित बलदवा (3.5), प्रभु अर्जुन (3) वि.वि. अरिव कामत (3), वेदांत काळे (3) वि.वि. अयन घुले (3).

बातम्या आणखी आहेत...