आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोण आहेत ही माणसं? कुठून आली अचानक? याआधी कुठं होती? कुठं नि कधी जन्माला आली नेमकी? जसं काय आताच हा प्रांत तयार केला गेला नि रंगरंगोटी करून उभारला गेलाय असं कानीकपाळी चीत्कारून सांगितलं जातंय सगळीकडं... या जमिनीवर जणू कुणीच नव्हतं काल.. म्हणे इतिहासात रमणं बंद करा! जसे काही या भूमीला इतिहासच नव्हता.. माणसं होती, पण जणू दखलपात्र नव्हती...
“व र्तमान गदारोळ इतका वाढवत नेला जातोय, की हे जग जणू केवळ “वर्तमानाने” व्यापून टाकलेले आहे. इतका गदारोळ वाढवत नेला जातोय, की जणू या देशाला भूतकाळ असा नव्हताच.. गदारोळाचा डेसिबल वाढवत नेल्याने उन्मत्त होत चाललीय दिशेची गरज न उरवलेली तरुण पिढी आणि इतिहासाच्या कानठळ्या बसवून नकळत केली जाऊ लागली आहेत त्याची शकले..”’ एका कागदावर आज घडलेली अस्वस्थ घटना लिहून काढावी आणि जमलं तर समाजमाध्यमांवर भिरकावून टाकावी, या हेतूनं आपण लिहायला सुरुवात केली आणि हे काय लिहितोय आपण? आपलं असंच होत आलं. आपल्यावर अन्याय झाला, की आपण त्या घटनेपुरता विचार करता करता डोळ्यात मावेल इतक्या दूरवर क्षितिजापलीकडच्या एकूण जगाचा पटच मांडू लागतो. म्हंजे परीक्षा देऊन मेरिट लिस्टीत नाव येऊन आता केवळ कॉलच येणार, याची गावात, वावरात, शिवारात सगळ्यांना माहिती देत असताना दोनेक महिन्यांनी समजलं, की आपली निवड झालेली नाही. वडील कांद्याला पाणी भरण्याबाबत बांधाशेजारच्या काकाला गंभीरपणे माहिती देत येत असताना मला पाहून अचानक म्हणाले, ‘निस्तं हुशार राहून, मार्क मिळवून नोकरी लागत नसते. ओबीसीमुळं अजून हाय संधी परीक्षांची. चालू दे..’ मग मी काहीतरी समर्थन देणार तेवढ्यात ते महत्त्वाचं बोलण्यात व्यस्त होऊन गेले. त्यांना वाटलं की हा अभ्यासच करतोय. कागदावर काहीही लिहिणं म्हणजे अभ्यास असतो, असं घरातल्या सगळ्यांना वाटतं. म्हंजे मी आत्महत्येचं पत्र लिहीत बसलो, तरी ‘दादा, जेवायला बोलवलं. चाल. बाकीचा अभ्यास नंतर कर..’ अशी बहिणीची हाक येईल. या सगळ्या प्रकारांमुळे एकूण दु:खात राहण्याचीही नीटनेटकी मुभा मिळत नाही. रात्री शांततेत हे सगळं बेरोजगारीचं दु:ख लिहीत बसावं, तर पाणी भरायसाठी रात्रभर मोटरीवर ध्यान ठेवावं लागतं. दु:ख, वेदना या अशा रोजच्या वर्तमान जगण्याच्या राहड्यात पिचून जातात. त्यातून क्रिएटिव्हिटीचा रसच नामशेष होऊन जातो. म्हंजे हे फक्त माझ्याच घरात नाही, तं सगळ्या जगात (मला भाडं, पेट्रोल खर्चून जिथवर जाता येतं तेवढा भूमाग म्हंजे जग) हे असंच चालताना दिसतंय. लोक असे कुठून तरी कुठं तरी जयघोष करत जाता-येताना दिसत राहतात, की जणू त्यांचा ‘काल’ हा असा नव्हताच जणू. माणसांऐवजी या देशात फक्त कार्यकर्ते उरले आहेत, असं शहरात गेल्यावर, सोशल मीडियावर गेल्यावर ध्यानात यायला लागतं. ‘‘तुझा अभ्यास झाला, की खालच्या तुकड्यात जाऊन ये. पाणी किती भरावं लागंल ते दिवसाउजेडी पाहून ये. रातच्याला ध्यानात नाय येत.’’ वडील त्या काकासोबत मटण आणायला मोटारसायकलीवर निघून गेले फाट्याकडे.. आपण मात्र या शिक्षण यंत्रणेनं, या नोकरी देणाऱ्या यंत्रणेनं, या मुलाखतीवाल्या यंत्रणेनं, एकूणच या सरकारी - खासगी यंत्रणेनं आजवर सतत नाकारून आपल्यावर अपयशाचा मारलेला शिक्का आपण लिहून काढला पाहिजे. एकोणावीस इंटरव्ह्यू आणि तेहतीस परीक्षा देऊन पण या जगाच्या वर्तमानात आपल्याला जागाच नाही. ‘‘हे बघा, जग टेक्नॉलॉजीने फार पुढे गेलंय. तुम्ही ग्रामीण भागातील लोक फार जुन्या काळात जगतात. अपडेट झालं पाहिजे ना.. काय?’’ ‘‘सर, माझ्या शेतातली मोटार मी मोबाइलनं चालू-बंद करतो. मी खूप पोरांना शिकवली ही टेक्नॉलॉजी..’’ ते आणि त्यांच्या शेजारचे कानाला केस असलेले, बाजूचे जाड भुवया आणि एसीत बसूनही काखेत घाम आलेले आणि शेंदरी गंध लावलेले असे टोटल चार साहेब यांनी माझं कौतुक केलं. म्हणाले, ‘‘ते ठीक आहे, पण ही टेक्नॉलॉजी फार प्राचीन आहे. पंधरा वर्षांपूर्वीची. भूतकाळात, इतिहासात जगणं बंद करा आता. करिअर करायचंय ना?’’ हा कालचा ताजा इंटरव्ह्यू! कोण आहेत ही माणसं? कुठून आली अचानक? या आधी कुठं होती? कुठं नि कधी जन्माला आली नेमकी? जसं काय आताच हा प्रांत तयार केला गेला नि रंगरंगोटी करून उभारला गेलाय असं कानीकपाळी चीत्कारून सांगितलं जातंय सगळीकडं... या जमिनीवर जणू कुणीच नव्हतं काल.. म्हणे इतिहासात रमणं बंद करा! जसे काही या भूमीला इतिहासच नव्हता.. माणसं होती, पण जणू दखलपात्र नव्हती.. वर्तमान गदारोळाचे डेसिबल्स रोज रोज चेकाळत वाढवत नेणारी यंत्रणेभोवतालची लोचट, गिळगिळीत माणसं आपल्या पद्धतीनं आणून ठेवताहेत रस्त्यावरच्या भंगार बाजारात इतिहासाला.. स्वप्न नावाची गोष्ट अस्तित्वात न ठेवता भविष्यालाही दरबारापुढच्या प्रांगणात बांधून घालत असंख्य छळवणुकीतून केले जातेय त्याचे हिंस्र अमानवी जनावर.. बेरोजगारी, महागाई ही काही संकटंच नसतील येथून पुढं... ती आभूषणं असतील या भूमीची. ती वैशिष्ट्ये म्हणून गणली जावीत, यासाठी जोरदार यंत्रणा कामाला लागलेली दिसते आहे. ती वैशिष्ट्ये म्हणून नसती, तर सारा देश उतरला नसता का रस्त्यावर? ती वैशिष्ट्ये म्हणून नसती तर सारी तरुण पिढी वणवे बनून फिरली नसती का देशभर? सगळं काही विझून गेलेली, प्रेतवत निर्विचार तरुण पिढी हे या भूमीचं वर्तमान असावं.. मी पण त्यात! बसवलेल्या कानठळ्या कधीच पुन्हा दुरुस्त होऊ नयेत, यासाठी राबवले जाताहेत असंख्य दृश्य-अदृश्य हात.. आम्हाला जगवण्यापेक्षा प्रेतवत जिवंत ठेवणं हे स्वस्त असून आम्ही आत्महत्याही करणार नाही आणि बंडखोरीही करणार नाही, याची खात्री आहे यंत्रणेला... काही होईल आम्हाला निष्भाव निष्प्रभ केल्यानं? कदाचित आम्ही आनंद - दुःखाच्या पलीकडे जाऊ आणि या भूमीचा “शांततेचा” प्राचीन लौकिक पुन्हा विश्वात प्रस्थापित होऊन आनंदी देशांच्या इंडेक्समध्येही मावणार नाही, इतकी ही भूमी स्वर्गीय होऊन जाईल.. आणि हे असे अफाट तत्त्वज्ञान अमलात आणणारी ‘न भूतो’ अशी अलौकिक यंत्रणाही या काळाला लाभली आहे.. ऐतिहासिक योगदान वगैरेंची पार्श्वभूमी असलेली माणसं किंवा विचार वा परंपरा याचा या भूमीला उपयोग नसून पन्नास, सत्तर, शंभर, चारशे, हजार, चार हजार वर्षांचे इतिहास आता कालबाह्य ठरवून केवळ अलीकडच्या दोन दशकांपासूनच्या घटनांना इतिहासाचा दर्जा द्यावा, असे निश्चित केले जात आहे जणू.. जुना इतिहास तरुण पिढीला विचलित करतो. त्याला जुन्या इतिहासातील माणसं जिवंत होऊन भेटवणंही यंत्रणेला, शिक्षण व्यवस्थेला अशक्य असल्याने अलीकडच्याच दोन दशकातील इतिहास सांगून त्याच्यावरचा भार कमी करावा, असा विचार केला जात आहे. शिवाय, अलीकडच्या इतिहासातील माणसं ही पटकन एका दिवसात महापुरुष वगैरे बनत असल्याने त्यांचा खूप खोलवर जाऊन अभ्यास करत बसण्याची गरजही उरली नाही. त्याचप्रमाणे, ही दोन दशकांतील “ऐतिहासिक” म्हणून हिंडणारी माणसं जिवंत दिसत असल्यानं इतिहासावर चटकन् विश्वास ठेवणारी नवी पिढी उदयास येऊ लागली आहे. या भूमीतील चेहरे नसलेल्या आमच्या वडिलांसारख्या, माझ्यासारख्या, शेजारचे शेतमालक काकांसारख्या नि त्यांच्या जागल्यासारख्या सामान्य माणसांसाठी वेगळा विकास वगैरे करायची गरज आता भासणार नाही पुढं. सर्व यंत्रणांच्या सरसकट दैवतीकरणातून माणसांची काळजी मिटून सत्तेवरील मानवविकासाचा मोठा अतिरिक्त ताण कमी होईल आणि जगावर राज्य करण्याच्या महत्त्वाकांक्षेवर तिला लक्ष केंद्रित करता येईल. कारण कारभार हाकणाऱ्यांच्या हे ध्यानात आलंय, की या राष्ट्राच्या स्वातंत्र्योत्तर प्रगतीत केवळ इथली प्रजा म्हंजे मी आणि माझ्यासकट अनेक पोरांचं गावाकडचं बारदान हाच सर्वोच्च अडथळा आहे. आम्हाला या राष्ट्राच्या जागतिक विकासाशी सोयरसुतक नसून आम्ही भरधाव विकासाच्या रथापुढे आडवे होऊन अन्न-वस्त्र-निवारा, रोजगारासारख्या बेसिक गोष्टी मागत उभे राहतो आहोत सतत. शहरात सिग्नलवर अनेक लोक उभे राहतात तसे.. अन्यथा, आज आनंदाचा इंडेक्स जगातच नव्हे, ब्रह्मांडात सर्वोच्च असलेलं हे एकमेव राष्ट्र राहिलं असतं.. आपण शेतकरी, सामान्य मजूर, बेरोजगार, कर्जबाजारी भंपक लोकच नव्याने जन्मलेल्या या राष्ट्राच्या जागतिक प्रगतीतला अडसर आहोत, असं प्रामाणिकपणे मला वाटतं!
दत्ता पाटील dattapatilnsk@gmail.com संपर्क : 9422762777
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.