आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपद्रव:सात वर्षांत अडीच कोटी खर्च करून 28 हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण, तरी अनेक कॉलन्यांमध्ये दहशत कायम

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक वॉर्डांमध्ये भटक्या कुत्र्यांचा मोठा उपद्रव आहे, पण मनपा त्यांना अटकाव करत नाही, असा नागरिकांचा आरोप आहे तर ‘डॉग व्हॅन आली की कुत्रे पळून जातात’ एवढे कारण देऊन मनपा कर्मचारीही हात वर करतात. मात्र रात्रीच्या वेळी या कुत्र्यांनी अनेकांवर जीवघेणे हल्ले केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ‘आरटीआय’मधील माहितीनुसार, सात वर्षांत तब्बल २ कोटी ६६ लाख ११ हजार ५० रुपये खर्च करून २८ हजार ५३३ कुत्र्यांचे निर्बीजीकरण केल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला.

दुसरीकडे, शहराच्या अनेक कॉलन्यांमधून भटक्या कुत्र्यांची दहशत मात्र वाढतच चालली आहे. दरम्यान, या खर्चाची चौकशी करण्याची मागणी माजी उपमहापौर प्रमोद राठोड व माजी नगरसेवक गोकुळसिंग मलके यांनी केली आहे. चौका-चौकात, मुख्य रस्त्यावर मोकाट कुत्रे मोठ्या संख्येने फिरतात. लहान मुले, वृद्ध दिसले की त्यांच्यावर कुत्रे हल्ले करतात. त्यामुळे अनेक जण जखमी झाले आहेत. मनपा प्रशासनाने या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक करून श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्या.

मलके यांनी ‘आरटीआय’मधून मिळवलेल्या माहितीनुसार, २०१५-१६ व २०११६- १७ या दोन वर्षांत महाराणा एजन्सीमार्फत अनुक्रमे ६७२ व ३०७ श्वान पकडण्यात आले. २०१७-१८ या वर्षात मनपाच्या कर्मचाऱ्यांनी केवळ ७५ श्वानांवर शस्त्रक्रिया केली. २०१८-१९ मध्ये पुण्यातील ब्लू क्रॉस सोसायटीला तर २०१९-२० मध्ये झारखंड येथील होप अँड ॲनिमल ट्रस्टला हे काम दिले होते. २०२०-२१ या वर्षात उषा एंटरप्रायझेस राजस्थान या संस्थेने १० हजार कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली. २०२१-२२ मध्ये अरिहंत वेल्फेअर सोसायटी उस्मानाबादने (डिसेंबर २०२१ पर्यंत) ८,८२४ श्वानांवर शस्त्रक्रिया केल्याची नोंद आहे.

‘महाराणा’ला शिवसेनेचा आशीर्वाद
माजी नगरसेवक राठोड म्हणाले, ‘महाराणा एजन्सी ही शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याची आहे. सुरुवातीला या संस्थेने श्वानांचे काम घेतले. नंतर याच एजन्सीला महापालिकेत कंत्राटी पद्धतीने कर्मचारी पुरवण्याचे काम देण्यात आले. इतर वेळी श्वानांना पकडण्याच्या कामासाठी दोन वेगवेगळ्या कंपन्या नेमल्याचे दिसत असले तरी त्यामागे ‘महाराणा’च आहे. वेगवेगळ्या नावांनी हीच कंपनी कामे करत आहे. त्यामुळे या व्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी राठोड व मलके यांनी केली आहे.

एकच वर्ष काम केले, आरोप राजकीय हेतूने
२०१५-१६ या वर्षीच आम्ही हे काम केले. तेही फक्त कुत्रे पकडून देण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून दिले. इतर कंपन्यांशी आपला काहीही संबंध नाही. राजकीय हेतूने प्रेरित केलेले आरोप खोटे आहेत.
- विश्वनाथ राजपूत, महाराणा एजन्सी

बातम्या आणखी आहेत...