आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कडक लॉकडाऊन:औरंगाबादेत लॉकडाऊन पहिल्यापेक्षा अधिक कडक; आजपासून 18 जुलैपर्यंत शहर बंद, बाहेर फिरल्यास गाडीसह परवाना जप्त

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांची तगडी फौज कार्यरत, औषधी दुकाने 24 तास खुली राहणार

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी औरंगाबाद शहरात १० ते १८ जुलै कालावधीत लॉकडाऊन होणार आहे. आता लॉकडाऊनची अत्यंत कठोरपणे अंमलबजावणी केली जाणार असून त्यासाठी पोलिसांचा तगडा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

दुचाकी-चारचाकीवर विनाकारण बाहेर फिरल्यास परवाना रद्द करण्यात येणार आहे. यासंदर्भातील सविस्तर आदेश महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी (९ जुलै) काढले. त्यानुसार लॉकडाऊन काळात सकाळी फक्त अडीच तास दूध वितरणास परवानगी असेल. वृत्तपत्र प्रतिनिधी, सरकारी तसेच वैद्यकीय, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच दुचाकी वापरता येईल. सर्व औषधी विक्री दुकानांना २४ तास खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सव्वा महिन्यापूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये दुचाकीच्या वापरावर कोणतेही बंधन नव्हते. किराणा दुकाने, भाजी बाजार सुरू होता. त्यामुळे अनेक जण अत्यावश्यक काम आहे, धान्य- भाजी खरेदी करायची, असे म्हणत घराबाहेर पडले. आताच्या लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्याची दुचाकी जप्त, परवाना रद्द होईल. शिवाय भाजी बाजारही बंद राहणार आहे, असे पांडेय यांनी आदेशात म्हटले आहे.

औषधी दुकाने २४ तास खुली राहणार

> औषधी दुकाने २४ तास खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

> अंत्यसंस्कार, अंत्यविधीसाठी केवळ २० व्यक्तींनाच परवानगी आहे.

> घरपोच अन्नपदार्थ, दारू बंद, सकाळी अडीच तास दूध वितरणास परवानगी

> वृत्तपत्र प्रतिनिधी, सरकारी तसेच वैद्यकीय, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच वाहनाची मुभा

हे असेल बंद

१. घरपोच खाद्य- पदार्थ पुरवठा सेवा

२. किराणा दुकाने

३. भाजी बाजार

४. खासगी पेट्रोल पंप

५. हॉटेल, खानावळी

६. सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे

७. सलून्स, पार्लर

८. बांधकामे

औरंगाबाद, मालेगावच्या वाढत्या कोरोनावर मुख्यमंत्र्यांना चिंता

मुंबई | औरंगाबाद, मालेगाव आणि मुंबई महानगर क्षेत्रात वाढत्या कोरोना संसर्गावर चिंता व्यक्त करून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी लाॅकडाऊन आहे, त्यासंदर्भात काय पुढे काय निर्णय घ्यावा, लोकांची काय मागणी आहे, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाकरे यांनी ‘वर्षा’ निवासस्थानावर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांची मते जाणून घेतली. बैठकीस ९ कॅबिनेट मंत्री आणि ४ राज्यमंत्री हजर होते.

0