आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृग नक्षत्र:जिल्ह्यात बहुतांश भागात मृग नक्षत्राची दमदार सलामी; अर्धा तास बरसला

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजिंठा रोहिणी नक्षत्र कोरडे गेले. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण होते. मात्र मृग नक्षत्रात गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता तब्बल पाऊण तास वाऱ्यासह धो-धो पाऊस बरसला. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले. मात्र अचानक पाऊस झाल्याने चाकरमान्यांमध्ये एकच पळापळ सुरू झाली. अजिंठा बसस्थानकासमोर रस्ते महामार्ग प्राधिकरणाने काम अपूर्ण सोडल्याने रस्त्यावर पाण्याचा तलाव तयार झाला हाेता. यामुळे रस्ते महामार्ग प्राधिकरणाने लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे अशी मागणी होत आहे. वादळ-वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या; विद्युत सेवा कोलमडली

वैजापूर वैजापूर तालुक्यात शहर व ग्रामीण परिसरात गुरुवारी (ता. ०९) सायंकाळी मृग नक्षत्रातील पावसाचे आगमन झाले. अर्धा तासभर कोसळलेल्या पावसामुळे महिनाभरापासून घामाघूम झालेल्या नागरिकांना थंडावा मिळाला. दरम्यान, जोरदार वादळी वाऱ्याच्या वाटेने आलेल्या पावसामुळे महावितरण कंपनीची वीज वितरण सेवा कोलमडून पडली होती. वीजप्रवाह वाहणाऱ्या तारांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. दोन दिवसांपासून वातावरणात बदलामुळे सर्वत्र जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज फोल ठरला होता. खंडाळा परिसरात बुधवारी सायंकाळी पाऊस झाला.

पिशोर : दमदार आगमन, पाच वाजेपासून बत्ती गुल, रात्री उशिरापर्यंत वीज नाही पिशोर येथे गुरुवार, ९ जून रोजी सायंकाळी मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसाने ढगांच्या गडगडाट व विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याने जोरदार सलामी दिली. पिशोरसह शफियाबाद, मोहंद्री परिसरात मृग नक्षत्राने गुरुवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेदरम्यान हलक्या सरींनी हजेरी दिल्याने धूळपेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. ज्येष्ठांच्या सांगण्यानुसार मृग नक्षत्राच्या पावसात भिजल्याने सर्दी, ताप व खोकला आदी रोगराई होत नसते अशी श्रद्धा अजूनही ग्रामीण भागात आहे. बाळगाेपाळांनी पहिल्या पावसात भिजण्याचा मनसाेक्त अानंद घेतला.

पिशोर येथे पहिल्याच पावसात भिजण्याचा बच्चे कंपनीने मनसोक्त आनंद लुटला. छाया : ज्ञानेश्वर दवंगे औरंगाबाद जिल्ह्यात मृग नक्षत्राचा पहिलाच पाऊस गुरुवार दि. ९ रोजी सायंकाळी बरसल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. तर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. सकाळपासून ऊन- सावल्यांचा खेळ सुरू होता. दुपार नंतर वातावरणात बदल झाला. सायंकाळी जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली तर काही ठिकाणी रात्री उशिराने पावसाचे आगमन झाले. पावसामुळे शेतकरी वर्गात आता पेरणीची लगबग राहील.

बातम्या आणखी आहेत...