आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा“महिला, महाविद्यालयीन तरुणींच्या सुरक्षेबाबतचे वाढते गुन्हे गंभीर बाब आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात काम करताना महिलांच्या सुरक्षेसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये ‘सुरक्षित कॅम्पस’ ही संकल्पना राबवा. शाळांमध्ये एक विद्यार्थी, विद्यार्थिनीची पोलिस कॅडेट म्हणून निवड करून पोलिस बडी तयार करा. त्यात त्यांना व्यवस्थित कायदेशीर प्रशिक्षण द्या. ते शाळेतील व इतर विद्यार्थ्यांमधला दुवा ठरू शकतील,’ असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी पोलिसांना दिले. डॉ. गोऱ्हे चार दिवस औरंगाबादच्या दौऱ्यावर आल्या आहेत. शनिवारी त्यांनी पोलिस आयुक्तालयात “महिला अत्याचार व उपाययोजना’ यावर आढावा बैठक घेतली. काही दिवसांपूर्वी देवगिरी महाविद्यालयात अठरावर्षीय मुलीची एकतर्फी प्रेमातून हत्या झाली. त्यानंतर खुनाचे मोठे सत्र सुरू झाले. मराठवाड्यातही महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या. त्यावर गोऱ्हे यांनी अधिकऱ्यांशी चर्चा केली. त्या म्हणाल्या की, येत्या पंधरा दिवसांत सुरक्षित कॅम्पस ही संकल्पना राबवा. यात शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहात विद्यार्थिनींसाठी तक्रारपेट्या, तक्रार करण्यासाठी आवश्यक ई-मेल आयडी लावावे, अशा सूचना त्यांनी केल्या. नंतर त्यांनी पोलिस आयुक्त कार्यालयातील कमांड कंट्रोल सेंटरला भेट दिली. या वेळी पोलिस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम. प्रसन्ना, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, जालना पोलिस अधीक्षक आर. रागसुधा, बीडचे पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक नवनीत कांवत उपस्थित होते.
{ एकल महिलांचे मदत गट करा. { महाविद्यालय, शाळांत तक्रारपेटी लावा. त्याचे पालन होतेय की नाही याचा पाठपुरावा करा. { प्रत्येक आस्थापनेत विशाखा समितीची स्थापना करा. { महिला दक्षता समित्यांच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा घ्या. { दामिनी पथकांच्या पोलिसांना वारंवार रिफ्रेशर प्रशिक्षणे द्यावीत. { शाळेत विद्यार्थी पोलिस कॅडेट नेमून त्यांना पोलिस प्रशिक्षण द्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.